Health Tips : बीपी नॉर्मल करायचा आहे? आहारात 'या' गोष्टींचा समावेश करा
Health Tips : आहार आणि जीवनशैलीत बदल करून उच्च रक्तदाब नियंत्रित केला जाऊ शकतो. विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाल्ल्याने बीपी नियंत्रित ठेवता येतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
Winter Health Tips : बदलत्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि राहणीमान हे अनेक आजारांचे कारण बनले आहे. बिघडलेल्या जीवनशैलीमुळे रक्तदाब म्हणजेच बीपीची समस्या आज सामान्य झाली आहे. साधारणपणे प्रत्येक घरात तुम्हाला बीपीचा पेशंट नक्कीच सापडेल. आपले हृदय शरीराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये रक्त पंप करते. आपल्या धमन्यांच्या भिंतीवर दबाव टाकून रक्त पुढे सरकते त्याला रक्तदाब किंवा बीपी म्हणतात. बीपी वाढल्यामुळे, धमन्या आणि हृदयावर दाब पडतो, ज्यामुळे लोकांना हृदयविकाराचा झटका किंवा हृदयाशी संबंधित आजार होतात.
बीपीचे दोन प्रकार
बीपीचे दोन प्रकार आहेत. पहिला सिस्टोलिक आणि दुसरा डायस्टोलिक. निरोगी व्यक्तीचा रक्तदाब सामान्यतः 120/80 mmHg पेक्षा कमी असतो. जर एखाद्या व्यक्तीचे बीपी यापेक्षा जास्त किंवा कमी असेल तर त्याला बीपीची समस्या आहे. उच्च रक्तदाबामुळे व्यक्तीला स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका, हृदयक्रिया बंद पडणे, मूत्रपिंड निकामी होणे अशा गंभीर समस्या उद्भवू शकतात. बीपीची लक्षणे सहसा सुरुवातीला दिसत नाहीत, त्यामुळे तुम्ही तुमचे बीपी नियमितपणे तपासत राहणे महत्त्वाचे आहे.
आरोग्य पोषणतज्ञ भक्ती कपूर यांच्या मते, उच्च रक्तदाब ही एक अशी स्थिती आहे जी शरीराच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम करते. जर एखाद्या व्यक्तीला उच्च रक्तदाब असेल तर रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर रक्ताचा दाब सतत वाढत जातो. त्यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी अधिक कष्ट पडतात. जर बीपीवर वेळेवर उपचार केले नाहीत तर एखाद्या व्यक्तीला स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका आणि इतर गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. जीवनशैलीतील बदल, धूम्रपान न करणे, व्यायाम आणि चांगला आहार यामुळे उच्च रक्तदाब टाळता येतो. ज्या लोकांना सुरुवातीला उच्च रक्तदाबाची माहिती नसते किंवा ज्यांना रक्तदाबाचा त्रास जास्त होतो, त्यांना औषधांची गरज असते. ज्या लोकांना उच्च रक्तदाब आहे त्यांना बीपीची औषधे दररोज घेण्याचा सल्ला दिला जातो.
न्यूट्रिशनिस्ट भक्ती कपूर यांनी अशा गोष्टींबद्दल सांगितले आहे की, जर एखाद्या व्यक्तीने त्यांचा आहारात समावेश केला तर बीपीची समस्या कमी होऊ शकते.
'हे' पदार्थ उच्च रक्तदाब राखण्यास मदत करतात
आंबट पदार्थ : आंबट पदार्थ खाल्ल्याने ब्लडप्रेशर सुरळीत राहते. त्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, जे बीपी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरते. तुम्ही द्राक्षे, लिंबू, संत्री इत्यादींचे सेवन करू शकता.
फॅटी फिश : सॅल्मन आणि फॅटी फिशमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड आढळते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले असते.
जांभूळ : जांभळामध्ये अँथोसायनिन्स असते जे रक्तातील नायट्रिक ऑक्साईडचे प्रमाण वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे बीपी नियंत्रणात राहते.
भोपळ्याच्या बिया : भोपळ्याच्या बियांना पोषक तत्वांचे पॉवर हाऊस देखील म्हटले जाते. भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने बीपीही राखला जातो.
या फळांच्या सेवनानेही बीपी दूर राहतो
निरोगी आहाराद्वारे बीपी राखता येतो. यासाठी केळी, सफरचंद, नाशपाती, मनुका, किवी, आंबा, टरबूज, डाळिंब, प्लम्स, जर्दाळू, द्राक्षे, एवोकॅडो, टोमॅटो, लिंबूवर्गीय फळे आणि बेरी इत्यादींसह अनेक फळे आणि भाज्या आहेत.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :