Children's Day 2023 : पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजरा करतात बालदिन; वाचा या दिनाचा इतिहास आणि महत्त्व
Children's Day 2023 : लहान मुल म्हणजे नेहरूंचा जीव की प्राण. "मुलं म्हणजे देवा घरची फुलं" असं पंडित जवाहरलाल नेहरू कायम म्हणायचे.
Children's Day 2023 : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांची आज जयंती. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन भारतात बालदिन (Children's Day) म्हणून साजरा करण्यात येतो. 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबादमध्ये त्यांचा जन्म झाला होता. लहान मुल म्हणजे नेहरूंचा जीव की प्राण. "मुलं म्हणजे देवा घरची फुलं" असं ते कायम म्हणायचे. मुलांवरील त्यांचं अपार प्रेम पाहता हा दिवस त्यांच्या जयंतीनिमित्तानं भारतात 'बालदिन' म्हणून दरवर्षी साजरा केला जातो.
पंडित नेहरूंना मुलांविषयी वाटणार्या प्रेम आणि जिव्हाळ्याविषयी आदर व्यक्त करण्याचा हा मार्ग आहे. खरंतर बालकांसाठी प्रत्येक दिवस हा खास आणि आनंददायी असतो. मात्र, या दिवशी लहान मुलं आपला आनंद इतरांबरोबर अधिक उत्साहीपणे साजरा करतात. या दिवशी पालकांनीही मुलांना बालदिन नेमका का साजरा करतात याची विशेष जाणीव करून देणं गरजेचं आहे.
बालदिनाचा इतिहास काय?
जगात पहिल्यांदा इंग्लंडमध्ये 1856 मध्ये चेल्सी इथे बालदिन साजरा झाला. त्याकाळी चर्चमध्ये लहान मुलांसाठी एक स्पेशल दिवस ठेवण्यात आला होता. लहान मुलांसाठी त्यांच्या आवडीच्या खास गोष्टी, वेगवेगळे खेळ आयोजित करून त्यांचा हा खास दिवस साजरा करण्यात आला होता. त्यानंतर हळूहळू जगातील इतर देशांमध्ये बालदिन साजरा करण्यास सुरूवात झाली. जगभरात 1925 पासून 'बालदिन'साजरा केला जातो. जागतिक पातळीवर संयुक्त राष्ट्र संघाने 20 नोव्हेंबर 1954 ला बाल दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. आजही विविध देशांमध्ये 'बालदिन'च्या वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. भारतात मात्र 1964 नंतर 14 नोव्हेंबरला 'बालदिन' साजरा केला जाऊ लागला.
बालदिनाचे महत्त्व :
बालदिन साजरा करताना आपण अर्थातच चाचा नेहरूंचे त्यामागील विचार समजून घ्यायला हवेत. मुलामुलींना सुरक्षित आणि प्रेमाच्या वातावरणात वाढवले गेले पाहिजे. तसेच, त्यांना आपले आयुष्य फुलविण्याच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासात भर घालण्याच्या समान संधीही मोठ्या प्रमाणात मिळाल्या पाहिजेत. बालदिनाच्या निमित्ताने आपल्यापैकी प्रत्येकाला मुलांच्या कल्याणासाठी काहीतरी करण्याबाबतच्या आपल्या वचनबद्धतेची आठवण करून देणे गरजेचे आहे.
चाचा नेहरूंना आदरांजली
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू लहान मुलांमध्ये रमायचे आणि त्यांच्या लाघवी स्वभावामुळे मुलांनाही ते आपलेसे वाटायचे. 27 मे 1964 ला पंडितजींचे निधन झाले. लहान मुलांच्या लाडक्या 'चाचा' नेहरूंना आदरांजली म्हणून त्यांच्या जन्मदिनी अर्थात 14 नोव्हेंबरला भारतात 'बालदिन' साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या :