18th August 2022 Important Events : 18 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
18th August 2022 Important Events : ऑगस्ट महिन्यातील 18 तारखेचं महत्त्व नेमकं काय, या दिवशी इतिहासात काय घडलं होतं.
मुंबई : ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार, आजचा दिवस हा वर्षातला 230 वा दिवस असून आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. पहिल्या बाजीरावचा जन्म आणि देशाच्या शिक्षण व्यवस्थेला दिशा देणाऱ्या आयआयटी खरगपूरची आजच्याच दिवशी स्थापना करण्यात आली होती. जाणून घेऊया आजच्या दिवशीच्या इतिहासातील घडामोडी.
1700- पहिल्या बाजीरावाचा जन्मदिन
मराठा साम्राज्यातील लढवय्या पहिल्या बाजीरावचा आज जन्मदिन आहे. पहिल्या बाजीरावचा जन्म 18 ऑगस्ट 1700 रोजी झाला होता. पहिल्या बाजीरावाने दिल्ली आणि भोपाळच्या लढाईमध्ये पराक्रम गाजवला होता. उत्तरेत आणि दक्षिणेत मराठा साम्राज्याची घडी बसवण्यात पहिल्या बाजीरावचा मोठा वाटा होता.
1841 - जगात सर्वप्रथम ब्रिटनमधे राष्ट्रीय अग्निशमन दलाची स्थापना झाली.
1868- हेलियम दिवस
18 ऑगस्ट हा 'जागतिक हेलियम दिवस' म्हणून साजरा केला जातो. 1868 मध्ये या दिवशी सूर्यावर हेलियम गॅस असल्याचे निरीक्षण केले गेले. ग्रीक देव 'हेलियस'च्या नावावरून हेलियम हे नाव पडले. सर जोसेफ नॉर्मन लॅकियर विजयदुर्ग किल्ल्यावरून सूर्यग्रहणाचे निरीक्षण करत होते. त्यामुळे हेलियमच्या शोधाचे श्रेय या जागेला जाते. नॉर्मन ज्या प्लॅटफॉर्मवरून दुर्बिणीतून सूर्याचे निरीक्षण करीत होते, तो आजही साहेबाचा कट्टा म्हणून ओळखला जातो.
1900- विजयालक्ष्मी पंडित यांचा जन्मदिवस
संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या पहिल्या भारतीय अध्यक्षा विजयालक्ष्मी पंडित यांचा आज जन्मदिवस आहे. विजयालक्ष्मी पंडित यांचा जन्म 18 ऑगस्ट 1900 रोजी झाला. त्या पंडित नेहरुंच्या भगिनी होत्या. 1953 ते 1954 या काळात त्या संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या आठव्या अध्यक्षा होत्या.
1920 - अमेरिकेच्या स्त्रियांना मतदानाचा अधिकार
पुरुषांच्या सोबत आपल्यालाही मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी अमेरिकेतल्या स्त्रियांनी आंदोलन सुरू केलं होतं. त्या आंदोलनाला अखेर यश मिळालं आणि 18 ऑगस्ट 1920 साली अमेरिकेतल्य स्त्रियांना मतदानाचा अधिकार देण्यात आला.
1945 - इंडोनेशियाच्या पहिल्या अध्यक्षपदी सुकार्नो
इंडोनेशियाच्या पहिल्या अध्यक्षपदावर सुकार्नो यांची निवड झाली. सुकार्नो हे अलिप्तवादी चळवळीचे नेते असून त्यांनी पंडित नेहरु आणि युगोस्लाव्हियाच्या मार्शल टिटो यांच्या सोबतीने तिसऱ्या जगाचे नेतृत्व केलं.
1951- आयआयटी खरगपूरची स्थापना
आजच्याच दिवशी, 18 ऑगस्ट 1951 रोजी देशातील पहिल्या आयआयटीची स्थापना पश्चिम बंगालमधील खरगपूरमध्ये करण्यात आली. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या आयआयटीने देशात उच्च शिक्षणाचा पाया मजबूत केला.
1958 - बांग्लादेशचे ब्रोजन दास इंग्लिश खाडी पार करणारे पहिले आशियाई ठरले.
1963 - जेम्स मेरेडिथ हा मिसिसिपी विद्यापीठातून पदवी घेणारा पहिला कृष्णवर्णीय व्यक्ती ठरला.
1999- तुरुंगवास भोगत असलेल्या व्यक्तीला सर्वोच्च न्यायालयाने मतदानाचा अधिकार नाकाला
कोणताही गुन्हा शाबित झाल्यानंतर तुरुंगवास भोगत असलेल्या अथवा कोणत्याही कारणासाठी पोलीस कोठडीत ठेवण्यात आलेल्या व्यक्तीस मतदानाचा हक्क बजावता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.