Nashik News : सशस्त्र दलात मुलींचा टक्का वाढणार; नाशिकमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू, इथे करा अर्ज
Nashik News : नाशिकमध्ये सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षणासाठी प्रथम सत्राची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
Nashik News : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एनडीए) मुलींना प्रवेश देण्याचा निर्णय 2021 मध्ये केंद्र सरकारने (Central Government) घेतला होता. त्याअंतर्गत मुलींसाठी भारतात पहिली शासकीय सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था नाशिक (Nashik) येथे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आली आहे. त्या संस्थेत प्रथम सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील मुलींचे एनडीएतील प्रतिनिधीत्व वाढविण्यासाठी महत्वपूर्ण ठरणारी ही सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था प्रत्यक्षात जून, 2023 पासून सुरू होणार आहे. सैनिक सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेण्यासाठी www.girlspinashik.com या संकेतस्थळावर विद्यार्थीनींनी 12 मार्च, 2023 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने 9 एप्रिल, 2023 रोजी लेखी परीक्षा होणार असून पात्र विद्यार्थीनींची मुलाखत घेण्यात येणार आहे.
सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेच्या प्रथम आणि द्वितीय वर्षासाठी प्रत्येकी 30 विद्यार्थीनींना प्रवेशासाठी शासनामार्फत जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थीनींची निवास व्यवस्था सद्यस्थितीत असलेल्या माजी सैनिक मुलांचे वसतिगृहात (पत्रकार कॉलनी, त्र्यंबकरोड) येथे करण्यात येणार आहे. त्यासाठी अधिकाधिक विद्यार्थींनींनी सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घ्यावा, असे आवाहनही सैनिक कल्याण अधिकारी ओंकार कापले यांनी दिली आहे.
अशा आहेत प्रवेश पात्रतेच्या अटी
▪️ महाराष्ट्राची रहिवासी आणि अविवाहीत असावी.
▪️ जन्म 1 जुलै, 2006 ते 31 डिसेंबर, 2008 दरम्यान झालेला असावा.
▪️ इयत्ता दहावीमध्ये शिक्षण सुरू असणं आवश्यक आहे.
दादा भुसेंच्या मागणीला यश
नागपूर (Nagpur winter Session)) येथील हिवाळी अधिवेशनात पालकमंत्री दादा भुसे यांनी याबाबत प्रस्ताव मांडत नाशिकला सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेची मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांनी प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्यानंतर आता नाशिकमध्ये मुलींसाठी सैनिकी सेवा पूर्व प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे. भारतीय सीमेवर सैनिक म्हणून महाराष्ट्रातील मुलींचे प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात असावी, यासाठी नाशिक येथे शासकीय मुलींसाठी सैनिकी सेवा प्रशिक्षण संस्था सुरू झाली आहे. यासाठी आवश्यक निधी कर्मचारी पदांना राज्य शासनाने मान्यता दिली आहे. मुलींना या संस्थेत प्रथम वर्षासाठी 30 आणि द्वितीय वर्षासाठी 30 विद्यार्थिनींना प्रवेशासाठी जागा शासनामार्फत निश्चित करण्यात आले आहेत.