Nashik News : संरक्षण दलात सैन्य अधिकारी व्हायचंय, आता नाशिकला मुलींसाठी प्रशिक्षण संस्था
Nashik News : सैनिक होऊ पाहणाऱ्या नाशिकमधील इच्छुक मुलींसाठी महत्वाची बातमी आहे.
Nashik News : सैनिक (Indian Army) होऊ पाहणाऱ्या इच्छुक मुलींसाठी महत्वाची बातमी असून आता सैनिक होण्यासाठी कुठे बाहेर जावे लागणार नाही. कारण नाशिकमध्ये मुलींसाठी सैनिक सेवा प्रशिक्षण संस्था मंजूर झाली आहे. या प्रबोधिनीमध्ये प्रवेश घेण्यासाठी शासकीय मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था मंजूर करण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी दिली.
सैन्यात भरती (Indian army) होण्यासाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये एनडीए (NDA) मुलींना प्रवेश देण्याचा निर्णय केंद्र शासनाने सन 2021 मध्ये घेतला. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा प्रवेश व्हावा, या हेतूने महाराष्ट्र शासनामार्फत 1977 मध्ये औरंगाबाद येथे मुलांसाठी सैनिकी सेवा पूर्व प्रशिक्षण संस्था स्थापन झाली. केंद्राच्या धोरणानुसार पुणे येथील प्रबोधनीत महाराष्ट्रातील जास्तीत जास्त मुलींचा प्रवेश व्हावा, या हेतूने नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे माजी सैनिक कल्याण खात्याचा मंत्रीपदाचा कार्यभार असताना त्यांनी नाशिकमध्ये मुलींसाठी सैनिकी सेवा पूर्व शिक्षण संस्थेसाठी प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात पालकमंत्री दादा भूस यांनी याबाबत प्रस्ताव मांडत नाशिकला सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेची मागणी केली. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रस्तावाला मान्यता देत लवकरच नाशिकमध्ये मुलींसाठी सैनिकी सेवा पूर्व प्रशिक्षण मिळणार आहे. भारतीय सीमेवर सैनिक म्हणून महाराष्ट्रातील मुलींचे प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात असावी, यासाठी नाशिक येथे जून 2023 पासून शासकीय मुलींसाठी सैनिकी सेवा प्रशिक्षण संस्था सुरू होणार आहे. यासाठी आवश्यक निधी कर्मचारी पदांना राज्य शासनाने मान्यता दिली आहे. मुलींना या संस्थेत प्रथम वर्षासाठी 30 व द्वितीय वर्षासाठी 30 विद्यार्थिनींना प्रवेशासाठी जागा शासनामार्फत निश्चित करण्यात आले आहेत. या विद्यार्थिनींच्या निवासाची व्यवस्था माजी सैनिकांच्या मुलींच्या वस्तीगृहात करण्यात येणारा असून पोलीस अकॅडमी केंद्र येथे मुलींना सैनिकी पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात जवळपास 39 सैनिकी शाळा असून सातारा येथील पहिली सैनिकी शाळा आहे. त्यानंतर औरंगाबाद येथे सैनिकी सेवा पूर्व शिक्षण संस्था असून पुण्यात देखील एक संस्था आहे. विद्यार्थ्यांमध्ये सांघिक वृत्ती, शिस्त, नेतृत्व, विश्वास, शौर्य, देशभक्ती या गुणांची जोपासना व्हावी व आत्मविकास व्हावा हा या शाळांचा प्रमुख उद्देश आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी मध्ये प्रवेश घेऊन तरुण तरुणींनी राष्ट्रसेवा करावी, या व्यापक उद्देशाने देशासह राज्यात सैनिकी शाळा सुरू केलेले आहेत. दरम्यान पुण्यात राणी लक्ष्मीबाई ही मुलींची पहिली सैनिक शाळा असून त्यानंतर आता नाशिक मध्ये मुलींसाठी सैनिकी शाळा सुरू करण्यात येणार आहे.