Esports : भारतात ई-स्पोर्ट्सचा वाढता प्रसार, आशियाई खेळ, कॉमनवेल्थच्या ई-स्पोर्ट्समध्ये टीम इंडियाचा सहभाग
Esports : कोरोनाच्या संकटानंतर ई-स्पोर्ट्स खेळणारे संघ आणि खेळाडूंची संख्या जवळपास दुपटीने वाढल्याचं पाहायला मिळालं आहे.
Esports Evolution : ई-स्पोर्ट्स अर्थात ऑनलाईन व्हिडीओ गेमिंगच्या मदतीने विविध क्रिडा स्पर्धा खेळणाऱ्यांचं प्रमाण आणि अशा स्पर्धांचं प्रमाणही मागील काही काळात मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. मागील काही दशकात भारतातील ईस्पोर्ट्स क्षेत्राची उत्क्रांती कमाल असून काही वर्षांपूर्वी केवळ कॉलेज फेस्ट्स किंवा स्थानिक स्पर्धांमध्येच दिसणारे स्पर्धात्मक गेमिंग आता आंतरराष्ट्रीय क्रिडा स्पर्धांमध्ये दिसत आहे. आता ही ई-स्पोर्ट्स इंडस्ट्री जवळपास 250 कोटी रुपयांवर पोहोचली असून 600,000 पेक्षा जास्त खेळाडू आणि 100,000 संघ ई-स्पोर्ट्स खेळताना दिसत आहेत. अत्यंत आकर्षक वाटणाऱ्या या ईस्पोर्ट्स गेमिंगबद्दल अनेकांना माहित नसलं तरी आता भारतीय संघ कॉमनवेल्थ, आशियाई गेम्स 2022 अशा ईस्पोर्ट्सच्या स्पर्धांमध्ये सहभागी होत असल्याने लवकरच ई-स्पोर्ट्सची व्याप्ती आणखी नक्कीच वाढेल.
2022 च्या आशियाई गेम्समध्ये भारत सहभागी होत असला तरी हे पहिल्यांदा नसून 2018 सालच्या एडीशनमध्येही भारतीय संघ सहभागी झाला होता. जकार्ता येथे झालेल्या या स्पर्धेत 18 इतर संघासह भारतही सहभागी झाला असून हर्थस्टोन गेममधील आघाडीचा खेळाडू तीर्थ मेहताच्या मदतीने कांस्यपदकाला देखील भारताने यावेळी गवसणी घातली होती. आता ई-स्पोर्ट्स खेळांना अधिकृतपणे मान्यताप्राप्त पदक खेळांचा दर्जा मिळाल्याने गेम्सची व्याप्ती आणखी वाढणार आहे. त्यात भारत 5 प्रकारच्या विविध खेळात सहभागी होणार असून यामध्ये फिफा 22, स्ट्रीट फायटर 5, हर्थस्टोन, लीग ऑफ लेजेंड्स आणि डोटा 2( DOTA 2) या खेळांचा समावेश आहे.
आशियाई खेळांव्यतिरिक्त, यंदाच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये DOTA 2 आणि रॉकेट लीग या खेळांना प्रायोगिक कार्यक्रम म्हणून ई-स्पोर्ट्सचाही समावेश करण्यात आला होता. त्याआधी, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) टोक्यो ऑलिम्पिक 2020 पूर्वी व्हर्चूवल ऑलिम्पिक टूर्नामेंट (ई-स्पोर्ट्स टूर्नामेंट) आयोजित केली होती. तसंच 2007 पासून ऑलिम्पिक कॉऊन्सिल ऑफ आशिया अर्थात OCA मध्ये ईस्पोर्ट्स खेळांना स्थान आहे. भारतासह कोरिया, थायलंड, फिनलंड, इटली, ब्राझील, नेपाळ, इंडोनेशिया, तुर्कमेनिस्तान, मॅसेडोनिया, श्रीलंका, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, सर्बिया उझबेकिस्तान, कझाकिस्तान, मलेशिया, व्हिएतनाम आणि जॉर्जिया सारख्या सुमारे 46 देशांनी देखील ई-स्पोर्ट्सला नियमित खेळ म्हणून मान्यता दिली आहे. पण भारतात ई-स्पोर्ट्स अॅथलीट्सना जागतिक स्तरावर टँलेट सादर करण्यासाठी भारतात मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु असल्याने ई-स्पोर्ट्सची व्याप्ती दिसून येत आहे.
ई-स्पोर्ट्सद्वारे महसूलात वाढ
पारंपारिक खेळांप्रमाणेच,ई-स्पोर्ट्समध्येही अत्यंत चुरशीच्या स्पर्धा, कसून सराव, प्रेशन आणि खेळामध्ये रोमांच असल्याने या खेळांना फॉलो करणारे फॅन्स अर्थात चाहतेही वाढत असल्याने यातून महसूलात देखील वाढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे ई-स्पोर्ट्स पाहणाऱ्यांची संख्या अर्थात viewership देखील 152 देशांमध्ये 500 दशलक्षहून अधिक झाली आहे. एवढे सगळे फॅन्स ऑनलाईन या स्पर्धा पाहत असतात. यावेळी फेसबुक, युट्यूब, लोको आणि रुटर अशा प्लॅटफॉर्म्सचा वापर केला जातो. यामुळे स्ट्रमिंग करणारे ऑनलाईन गेमर्स चांगले पैसे कमवू शकत असून एक रोजगाराचा साधन ई-स्पोर्ट्स झालं आहे.
भारतात वाढती लोकप्रियता
YouGov ग्लोबल प्रोफाइल्सने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, जगातील चार पैकी एक व्यक्ती (जवळपास 25 टक्के) त्यांच्या आठवड्यातील किमान 7 तास त्यांच्या मोबाईल फोनवर व्हिडिओ गेम खेळण्यात घालवतो. भारतात, 19 टक्के लोकसंख्या एका आठवड्यात 1 ते 7 तास मोबाईल गेम खेळण्यात आणि 11 टक्के लोक 7-14 तास गेम खेळण्यात घालवत असतात. अलीकडे स्वस्त आणि अधिक प्रमाणात उपलब्ध मोबाइल डेटा आणि पॉकेट-फ्रेंडली स्मार्टफोन ही संख्या वेगाने वाढण्याचे कारण आहे. मोठ्या संख्येने लोक मोबाइल गेमिंगकडे वळत असल्याने, अॅप डाउनलोडच्या बाबतीत भारत हे सर्वात मोठे मोबाइल गेमिंग मार्केट बनलं आहे. त्यामुळे मोबाइल-केंद्रित गेम अर्थात ई-स्पोर्ट्स भारतात का वर्चस्व गाजवत आहेत, हे स्पष्ट दिसत आहे.
या सर्वासह कोरोनाही यामागे एक मोठं कारण आहे. कारण कोरोनाच्या संकटानंतर ई-स्पोर्ट्स खेळणारे संघ आणि खेळाडूंची संख्या जवळपास दुपटीने वाढल्याचं पाहायला मिळालं आहे. कारण कोरोनाच्या काळात अधिक काळ सर्वांना घरात थांबावं लागल्यने सर्वच वयातील व्यक्ती ई-स्पोर्ट्स खेळू लागल्याचं दिसून येत आहे. यामुळे विविध अशा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय इव्हेंट्सही ऑनलाईन पद्धतीने या काळात आयोजित होऊ लागल्या आहेत. यावेळी तब्बल 2 कोटींपर्यंतचं बक्षिसही काही स्पर्धांमध्ये दिलं जात असल्याचं दिसन आलं आहे. या वाढत्या स्पर्धांमुळे हे मार्केट 2025 पर्यंत 46 टक्क्यांनी वाढून 1,100 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. ई-स्पोर्ट्स केवळ गेम झोनमध्येच नाही तर आता सिनेमागृहांतही खेळला जाईल. कारण आयनॉक्स, पीव्हीआर हे देखील त्यांच्या सिनेमागृहांत ई-स्पोर्ट्स गेम्स खेळवणार आहेत. याशिवाय विविध रॅपर्स, अभिनेते आणि खेळाडू देखील ई-स्पोर्ट्समध्ये आवड दर्शवत असल्याचं दिसत आहे. यान्वयेच रॅपर रफ्तार, युजवेंज्र चहल, टायगर श्रॉफ यांचा समावेश आहे.
कोणते गेम ई-स्पोर्ट्स?
भारतात अजूनही नेमकं कोणत्या खेळांना ई-स्पोर्ट्स म्हटलं जाऊ शकतं याबद्दल गोंधळ आहे. त्यामुळे फिफा, काऊंटर स्ट्राईक, फोर्टनाईट आणि Dota अशा खेळांना ई-स्पोर्ट्स म्हटलं जाऊ शकतं. पण ऑनलाईन तीन पत्ती, रमी, पोकर आणि फँटसी स्पोर्ट्सना ई-स्पोर्ट्स म्हणता येणार नाही. त्यामुळे केवळ स्पर्धात्मक खेळ जिथे खेळाडू त्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांचा वापर व्हर्च्युअल, इलेक्ट्रॉनिक गेम खेळण्याकरता करतील अशा खेळांना ई-स्पोर्ट्स म्हणून ओळखलं जातं.
करिअर म्हणून ई-स्पोर्ट्स
ई-स्पोर्ट्सची वाढती इंडस्ट्री आणि यातून होणार मोठ्या प्रमाणातील कमाई यामुळे भारतीय तरुणांना करिअरचा एक चांगला पर्याय म्हणून ई-स्पोर्ट्स प्रवृत्त करत आहेत. भारतातील ई-स्पोर्ट्सच्या वाढीत भविष्यात मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे खेळाडूंसह ई-स्पोर्ट्स मार्केटिंग, कोचिंग, ई-स्पोर्ट्स पत्रकार, गेम डिझायनर इत्यादी विविध प्रकारचे करिअर पर्याय देखील उपलब्ध नक्कीच होणार आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी देखील सार्वजनिकरित्या सांगितले की त्यांना 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ई-स्पोर्ट्सचा समावेश करायचा आहे, स्पर्धात्मक गेमिंग ऑलिम्पिक आणि आगामी कॉमनवेल्थ खेळांमध्ये देखील सहभागी करण्याची वेळ आली आहे. दरम्यान या सर्वात भारतही आघाडीवर असेल असा विचार करायला हरकत नाही. दरम्यान ई-स्पोर्ट्स क्षेत्राने वाढवलेला महसूल तसंच अधिकृत खेळ म्हणून त्याला मिळणारी आंतरराष्ट्रीय मान्यता या सर्वांमुळे भारतातही ई-स्पोर्ट्स एक मोठी आणि वाढणारी इंडस्ट्री असेल हे स्पष्ट आह आहे.
Disclaimer: या लेखाचे लेखक ई-स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया (ESFI) चे संचालक आणि एशियन एस्पोर्ट्स फेडरेशन (AESF) चे उपाध्यक्ष आहेत. ESFI हे इंटरनॅशनल एस्पोर्ट्स फेडरेशन (IESF), ग्लोबल एस्पोर्ट्स फेडरेशन (GEF) आणि एशियन एस्पोर्ट्स फेडरेशन (AESF) चे पूर्ण सदस्य आहे. दरम्यान लेखीत मते ही त्यांची वैयक्तिक आहेत.
हे देखील वाचा-
FIFA Nations Cup 2022 : भारतीय संघाची ऐतिहासिक कामगिरी, फिफा नेशन्स कपमध्ये मिळवला पहिला-वहिला विजय