Year Ender 2025 : छावा, मनाचे श्लोक ते धुरंधर... कुठे राजकारण, तर कुठे कायद्याचा पेच; 2025 मध्ये वादग्रस्त ठरलेले 'हे' चित्रपट
Controversial film of 2025: यंदा अनेक चित्रपटांवरून वाद झाले. काही चित्रपटांमुळे राजकारण तापलं तर काहींनी थेट कायदेशीर लढाई लढली.

Year Ender 2025: हे वर्ष बॉक्स ऑफिसपेक्षा जास्त वादांमुळे गाजलं. अनेक चित्रपट त्यांच्या कथानकांपेक्षा, कलाकारांच्या निवडीवरून किंवा ऐतिहासिक संदर्भांमुळे चर्चेत राहिले. अनेक चित्रपटांवरून वाद झाले. काही चित्रपटांमुळे राजकारण तापलं तर काही चित्रपट कायदेशीर पेचात अडकले. काही सिनेमांवर कायदेशीर कारवाई झाली, तर काहींना तीव्र जनआक्रोशाला सामोरं जावं लागलं.वर्षभरात वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या अशाच काही चित्रपटांचा आढावा.(Controversial Films Of 2025)
Chhava: छावा
एखाद्या चित्रपटामुळे किती खोलवर परिणाम होऊ शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे छावा चित्रपट. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ झालेली. औरंगजेब कबर हटवण्यावरून सुरु झालेल्या वादाने हिंसक रूप घेतलं होतं. 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानंतर एकामागून एक वाद सुरु होते. या चित्रपटात औरंगजेब आणि मुघल सैन्याने छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध केलेल्या क्रूरतेचे चित्रण करण्यात आले होते.
छावा’ या चित्रपटावर ऐतिहासिक तथ्यांबाबत गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले. काही संघटना आणि वंशजांनी चित्रपटात इतिहासाची चुकीची मांडणी केल्याचा आरोप केला. विशेषतः संभाजी महाराजांच्या ‘लेजिम’ नृत्याच्या दृश्यावरून मोठा वाद निर्माण झाला. वाढत्या टीकेनंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी सार्वजनिकरित्या माफी मागितली.
Manache Shlok:मनाचे श्लोक
मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित आणि अभिनेता मनाचे श्लोक या चित्रपटाच्या शीर्षकावरून मोठा वाद निर्माण झाला होता. काही हिंदुत्ववादी संघटनांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला. मनाचे श्लोक हे समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या पवित्र ग्रंथाचे नाव व्यावसायिक चित्रपटाला वापरल्याने धार्मिक भावना दुखावल्याचे सांगत चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट थांबवण्याचा प्रकार घडला होता. या चित्रपटाला होणाऱ्या विरोधामुळे पुण्यासह इतर शहरांमधील चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाचा शो थांबवण्यात आला होता. नंतर, निर्मात्यांना चित्रपटाचं नाव बदलावं लागलं. आणि नवीन शीर्षकासह तो पुन्हा प्रदर्शित झाला.
Dhurandhar:धुरंधर
5 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित झालेला ‘धुरंधर’ प्रदर्शनाआधीच वादात अडकला होता. अशोक चक्र पुरस्कारप्राप्त शहीद मेजर मोहित शर्मा यांच्या कुटुंबीयांनी हा चित्रपट त्यांच्या मुलाच्या जीवनावर आधारित असल्याचा दावा करत दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती देण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र, केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने (CBFC) हा सिनेमा पूर्णपणे काल्पनिक असल्याचं स्पष्ट केल्यानंतरच त्याला हिरवा कंदील मिळाला. वाद असूनही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली.
Abir Gulal:अबीर गुलाल
वाणी कपूर आणि पाकिस्तानी अभिनेता फवाद खान यांचा ‘अबीर गुलाल’ भारतात प्रदर्शितच होऊ शकला नाही. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली. या पार्श्वभूमीवर चित्रपटाविरोधात तीव्र विरोध झाला आणि अखेर निर्मात्यांना भारतातील रिलीज रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
Sardar Ji 3:सरदार जी 3
‘सरदार जी 3’मधून पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर भारतीय चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार होती. मात्र, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर या चित्रपटालाही विरोधाचा सामना करावा लागला. पाकिस्तानी कलाकारांसोबत काम केल्यामुळे अभिनेता दिलजीत दोसांझ यांच्यावरही विविध स्तरांतून टीका झाली.
हरी हर वीरा मल्लू
पवन कल्याण अभिनीत ‘हरी हर वीरा मल्लू’वरही वादाची ठिणगी पेटली होती. काही संघटना आणि मुदिराज समाजातील गटांनी चित्रपटातील वीरा मल्लू हे पात्र लोकनायक पंडुगा सयाना यांच्याशी साधर्म्य साधत असल्याचा दावा केला. मात्र, निर्मात्यांनी हे पात्र काल्पनिक असल्याचं स्पष्ट केलं.
द ताज स्टोरी
परेश रावल यांच्या ‘द ताज स्टोरी’वर धार्मिक आणि ऐतिहासिक मुद्द्यांवरून मोठा वाद झाला. मोशन पोस्टर आणि प्रमोशनल सामग्रीत ताजमहालच्या घुमटात भगवान शिव किंवा शिवलिंगचे संकेत दाखवण्यात आल्याचा आरोप झाला. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा दावा करत विविध संघटनांनी तीव्र विरोध नोंदवला.
खालिद का शिवाजी अन् फुले चित्रपटावरूनही वाद
'खालिद का शिवाजी' या मराठी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी सकल हिंदू समाज या संघटनेने केली होती. या चित्रपटाच्या शीर्षकावरून आणि कथानकावरूनही काही आक्षेप घेण्यात आले होते. अनंत महादेवन दिग्दर्शित महात्मा फुले यांच्या जीवनावरील फुले या चित्रपटाचा ट्रेलरवरही काही लोकांनी आक्षेप घेतले होते. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.























