(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kamlakar Nadkarni : ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन, मराठी नाट्यसृष्टीवर शोककळा
Kamlakar Nadkarni : ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे आज रात्री निधन झाले.
Kamlakar Nadkarni : प्रसिद्ध नाट्यसमीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे आज रात्रीनिधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. मुंबईतील गोरेगाव येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 88 वर्षांचे होते. मागील अनेक दशकांपासून ते नाट्य समीक्षण करत होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने त्यांना 2019 साली जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. धो धो बरसणाऱ्या पावसासारखी नाट्य समीक्षा लिहिणारे, नाट्यवेडे अशी त्यांची ओळख होती.
कमलाकर नाडकर्णी यांनी ओळख नाट्य समीक्षक अशी असली तरी लेखक, नाट्य दिग्दर्शक आणि अभिनेता अशा सर्वच भूमिका ते जगले होते. अगदी बालरंगभूमी पासून त्यांनी कामाला सुरुवात केली होती. संगत, अपत्य, पस्तीस तेरा नव्वद, क क काळोखातला, रात्र थोडी सोंगे फार, चंद्र नभीचा ढळला अशा कितीतरी नाटकांसाठी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या होत्या.
नाट्य समीक्षक असलेल्या कमलाकर नाडकर्णी यांनी रंगभूमीवरदेखील काम केले आहे. नाडकर्णी यांनी सुधा करमरकर यांच्या 'लिटल थिएटर' या संस्थेच्या बजरबट्टू, गणपती बाप्पा मोरया, चिनी बदाम आदी बालनाट्यात काम केले आहे. 'बहुरूपी' या प्रायोगिक नाट्यसंस्थेच्या 'जुलूस' या नाटकातही त्यांनी काम केले होते. याच नाट्यसंस्थेसाठी राज्य नाट्यस्पर्धेसाठी त्यांनी काही इंग्रजी नाटकांचा मराठीत अनुवाद केला होता. महाराष्ट्रातील काही गावांमध्ये त्यांनी शिबिरांमध्ये नाट्य प्रशिक्षणार्थींनी मार्गदर्शन केले होते. 'नांदी' नावाच्या देविदास तेलंग यांच्या पाक्षिकात त्यांनी नाट्यपरीक्षणे लिहायला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी लोकप्रभा या साप्ताहिकात नाट्यसमीक्षणास सुरुवात केली होती. पुढे त्यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये नाट्य समीक्षण करण्यास सुरुवात केली.
आपली लिखाणाची एक विशिष्ट शैली, परखड मत यामुळे त्यांच्या समीक्षणाचा एक चाहता वर्ग निर्माण झाला होता. महाराष्ट्र टाइम्समधून निवृत्त झाल्यानंतर नाडकर्णी यांनी 'महानगर' या सायंदैनिकात सन 2000 ते 2010 या काळात 400 नाट्यपरीक्षणे लिहिली. त्यांपैकी निवडक 58 नाटकांची परीक्षणे ’महानगरी नाटकं’ या संग्रहात समाविष्ट करण्यात आली.
नाटकं ठेवणीतली, नाटकी नाटकं, महानगरी नाटकं ही त्यांनी लिहिलेली पुस्तके आहेत. कमलाकर नाडकर्णी यांनी नाट्यसृष्टीत दिलेल्या योगदानासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने त्यांना 2019 साली जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.