अभिनयास वडिलांचा विरोध, प्रेमसंबंधाबाबत समजताच काळीनिळं होईपर्यंत पाईपनं मारलं; मराठी अभिनेत्रीनं सांगितला स्ट्रगल
Komal Kumbhar on Career Love and Family Opposition: कोमल कुंभारने कुटुंबाच्या विरोधाला सामोरे जात अभिनयासाठी मुंबई गाठली. तसेच प्रियकरासोबत लग्नही केलं.

Komal Kumbhar on Career Love and Family Opposition: 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री कोमल कुंभार हिनं अलिकडेच गोकुळ दशवंतसोबत विवाहगाठ बांधली. तिच्या लग्नाची प्रचंड चर्चा झाली. सुरूवातीला तिच्या गोकुळसोबत असलेल्या नात्याला परिवाराकडून संमती नव्हती. कोमलच्या कुटुंबाने गोकुळसोबत असलेल्या नात्याचा विरोध केला. गोकुळसोबत लग्न करण्यास तसेच अभिनय क्षेत्रात करिअर करण्यास घरच्यांचा विरोध होता. मात्र, कुटुंबाचा विरोध स्वीकारत तिनं अभिनयासाठी मुंबई गाठली आणि स्वप्नांना पंख दिले. तिला मालिकेतून घराघरात ओळख मिळाली. अलिकडेच अभिनेत्रीनं एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिच्यासोबत तिचा पती देखील होते. या मुलाखतीदरम्यान, तिनं घरच्यांचा विरोध ते लग्नापर्यंतचा प्रवास कसा होता, याबाबत माहिती दिली.
या मुलाखतीत कुटुंबाबद्दल अभिनेत्री म्हणाली, "मला कुणीही त्रास दिलेला नाही. मला माझ्या वडिलांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं आहे. मी ऑडिशन दिलं होतं, आणि माझं सिलेक्शन झालं होतं. पण मला घरचे सोडायला तयार नव्हते. माझ्या आईने मामाला घरी बोलावून घेतलं. मामाने मला समजावण्याचा प्रयत्न केला. मी तेव्हा त्यांना म्हटलं मला काम करायचं आहे. तेव्हा माझ्या आईला संशय आला. तिनं मला विचारलं. "तुझं कुणासोबत प्रेमसंबंध आहे का?" तेव्हा मी तिला हो असं उत्तर दिलं. मला तेव्हा ही गोष्ट घरी सांगायची नव्हती, पण प्रेमात खरंच ताकद असते, हे मला त्यादिवशी कळलं", असं कोमल मुलाखतीत म्हणाली.
कुटुंबाचा विरोध तरीही स्वप्न पूर्ण केलं
"तेव्हा मी केवळ म्हणाले की, मला गोकुळसोबत जायचं आहे. हे ऐकल्यानंतर घरात शांतता पसरली. माझ्या मामाने ही गोष्ट जाऊन वडिलांना सांगितली. तेव्हा पाईपने मला मारलं. मला कुटुंबाने समजवण्याचा प्रयत्न केला. पण मी माझ्या निर्णयावर ठाम होते. दुसऱ्या दिवशी कुटुंबाने सांगितलं मला जा. तेव्हा मी गेले", असं अभिनेत्री कोमलने सांगितलं. नंतर कोमलचा नवरा गोकुळ म्हणाला, "त्यावेळी तिला कुटुंबाने मारलं. अंगावर वळ उठले होते. त्यानंतर ती ऑडिशनला गेली. अंगावर वळ उठलेले असताना तिनं मालिकेचं प्रोमो शूट केलं", असं गोकुळ म्हणाला. दरम्यान, अभिनेत्रीनं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुटुंबाचा विरोध झुगारून अभिनयाचं स्वप्न पूर्ण केलं. तसेच गोकुळसोबतही विवाह केला. सध्या अभिनेत्रीनं दिलेली मुलाखत सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.
























