Machchindra More Death: लेखक, नाटककार, गीतकार मच्छिंद्र मोरे यांचं निधन
अनेक नाटक, चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन करणारे गीतकार मच्छिंद्र मोरे यांचे निधन झाले आहे.
बकुळा नामदेव घोटाळे, मुक्काम पोस्ट लंडन, फियास्को, अंधपर्वं आदी चित्रपट नाटकाचे लेखक मच्छिंद्र मोरे यांचं शनिवारी कोरोनाने निधन झालं. ते 60 वर्षांचे होते. मूळ सातारा जिल्ह्यातून असलेल्या मोरे यांनी अत्यंत कष्टाने आपलं असं वेगळं स्थान निर्माण केलं होतं.
मच्छिंद्र मोरे वेगवेगळ्या चित्रकृतीच्या माध्यमातून सातत्याने काम करत राहिले. केदार शिंदे यांच्या चित्रपटासाठी त्यांनी लेखन केलं. लेखनासह त्यांना चित्रपट या माध्यमाबद्दल कमाल आस्था होती. म्हणूनच हा लेखक दिग्दर्शनातही उतरला. माझा नवरा तुझी बायको, मुक्काम पोस्ट लंडन या चित्रपटांना सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी जबाबदारी पेलली. त्यानंतर तेजस्विनी पंडित, नंदू माधव यांना घेऊन त्यांनी मुक्ती हा चित्रपट बनवला. याशिवाय, बाजीराव हा चित्रपटही त्यांनी दिग्दर्शित केला होता.
केवळ मराठीच नव्हे, तर हिंदीतही त्यांनी नाटकांचं लेखन केलं होतं. वेधपश्य, मोहनदास, जानेमन ही त्यांची नाटकं रंगभूमीवर आली. मकरंद अनासपुरे यांच पहिल व्यावसायिक नाटक असलेल्या बकरी या नाटकाच लेखनही मोरे यांचं. याशिवाय तीन पैशाचा तमाशा, झुलवा अशा मैलाचा दगड ठरणाऱ्या नाटकांसाठी त्यांनी गायक म्हणून जबाबदारी पेलली. मोरे यांच्या निधनाने मराठी लेखनविश्व हळहळलं आहे. सोशल मीडियावरही केदार शिंदे, सोनाली कुलकर्णी आदी कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.