Marathi Natak : रंगभूमीचा पडदा उघडताच रंगणार 'एका लग्नाची पुढची गोष्ट'चा प्रयोग
Marathi Theater : 22 ऑक्टोबर रोजी वांद्रेच्या पश्चिम रंगशारदा नाट्यमंदिरात रंगणार 'एका लग्नाची पुढची गोष्ट'चा प्रयोग.
Eka Lagnachi Pudhchi Goshta : 22 ऑक्टोबर रोजी रंगभूमीचा पडदा उघडणार आहे. त्यानिमित्ताने मराठी नाटकाचा पहिला प्रयोग रंगणार आहे. 22 ऑक्टोबर रोजी वांद्रेच्या पश्चिम रंगशारदा नाट्यमंदिरात प्रशांत दामले यांच्या 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या गाजलेल्या नाटकाचा एक खास प्रयोग ठेवण्यात आला आहे. या प्रयोगाची संकल्पना भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांची आहे. प्रयोगादरम्यान शासनाच्या नियमांचे पालन करण्यात येणार आहे. तसेच या प्रयोगाची खासियत म्हणजे 50 टक्के क्षमतेने रसिकांना विनामूल्य प्रयोग पाहता येणार आहे. रेड कार्पेट अंथरूण व गुलाबाचे फुल देऊन नाट्य रसिकांचे स्वागत करण्यात येणार आहे. तसेच या प्रयोगासाठी काही मराठी कलावंताना आमंत्रित करण्यात आले आहे.
गेल्या पावणेदोन वर्षांत मराठी रंगभूमीवरील पडद्यामागचे कलावंत, तंत्रज्ञ यांच्यावर वाईट दिवस आले होते. त्यांना अनेक संस्था आणि व्यक्तींनी मदत केली होती. यात प्रशांत दामले, अशोक हांडे यांच्यासह काही सामाजिक संस्थांचा सहभाग होता. त्यातील काही व्यक्ती आणि संस्थांचा प्रातिनिधीक सत्कार देखील प्रयोगादरम्यान करण्यात येणार आहे.
अनलॉकनंतर अनेक क्षेत्रांना मुभा देण्यात आली होती. पण नाट्यगृहाचा पडदा उघडण्यास ठाकरे सरकारने मज्जाव केला होता. त्यानंतर केली कलावंतांवर उपासमारीची वेळ आली होती. दरम्यान त्यांनी ठाकरे सरकार विरोधात आंदोलने केली होती. पण त्यातही ही मंडळी यशस्वी झाली नव्हती. पण आता मात्र या कलावंतांच्या लढ्यात सहभागी होत भाजप नेते आशिष शेलार यांनी समारंभापुर्वक 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकाच्या माध्यमातून पाठिंबा दिला आहे.
'एका लग्नाची पुढची गोष्ट' नाटकात ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले मुख्य भूमिकेत आहेत. तर या नाटकात कविता मेढेकर, अतुल तोडणकर, मृणाल चेंबुरकर, प्रतिक्षा शिवणकर, राजसिंह देशमुख, पराग डांगे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अद्वैत दादरकरने या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन केले आहे. याआधी नाट्यगृहात प्रयोग करायला शासनाने मान्यता दिली होती तेव्हा देखील या नाटकाचा पहिला प्रयोग 50 टक्के प्रेक्षकांच्या तुफान प्रतिसादात पार पडला. तेव्हा लॉकडाऊननंतर येणारा प्रेक्षकवर्ग हा काही वेळासाठी निगेटिव्ह वातावरणातून बाहेर पडत पॉझिटिव्ह होण्यासाठी, खदखदून हसण्यासाठी येत असतो. पन्नास टक्के प्रेक्षक आणि शंभर टक्के प्रतिसादात सध्या नाटकाची यशस्वी घोडदौड सुरू होती. यंदादेखील असेच चिन्ह दिसून येईल अशी आशा आहे.