Yogita Chavan : 'त्या' टास्कवेळी नेमकं काय घडलं? योगिता चव्हाण म्हणाली, 'मुलीच मुलींचे कपडे ओढत होत्या...'
Yogita Chavan : कॅप्टन्सी टास्कच्या वेळी योगिता आणि निक्की या दोघीही एकमेकींना चांगल्याच भिडल्या. त्यावेळी नेमकं काय झालं याविषयी आता योगिताने सांगितलं आहे.
Yogita Chavan : बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi New season) घरात तिसऱ्या आठवड्याच्या कॅप्टन्सी टास्कसाठी फ्रेंच फ्राईजचा टास्क देण्यात आला होता. त्या टास्कमध्ये आपल्या जवळ असलेले फ्रेंच फ्राईज हे सांभाळायचे होते. तेव्हा निक्की आणि योगिता या चांगल्याच भिडताना दिसल्या. पहिल्या दोन आठवड्यात शांत शांत असणारी योगिता (Yogita Chavan) ही तेव्हा चांगलीच आक्रमक झाली होती. पण तिसऱ्या आठवड्यात योगिताचा बिग बॉसच्या घरातील खेळ संपला आणि ती घराबाहेर पडली.
दरम्यान कॅप्टन्सी टास्कच्या वेळी नेमकं काय काय झालं याविषयी योगिताने एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. यावेळी तिने निक्कीवर रोष व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. तसेच तिने वैभवच्याही वक्तव्यांविषयी भाष्य केलं.
'टास्क जिंकण्यासाठी खूप खालच्या पातळीवर...'
त्या टास्कविषयी बोलताना योगिताने म्हटलं की, मी बाहेर आल्यावर तो एपिसोड पाहिला. त्यामध्ये वैभव बोलत होता की, कपडे फाटले तरी चालतील पण ओढ. त्यावर अंकिता त्याला ओरडल्यावर तो तिला म्हणाला की, ती एकटी थोडी खेळतेय. मी तर पलिकडे सांगतोय.यावर काय प्रतिक्रिया द्यायची हेच मला कळलं नाही. मी ते जॅकेट काढलं नाही कारण आतममध्ये माझा ड्रेस होता. जरी मी माझं जॅकेट काढलं असतं तर निक्कीने माझे कपडे ओढायलाही मागे पुढे पाहिलं नसतं. कारण ती मुलगी तशी आहे. तो टास्क जिंकण्यासाठी खूप खालच्या पातळीवर जातात लोकं आणि मला ते करायचंही नव्हतं. माझं जॅकेट ओढून गळा आवळला होता तिने. पण त्यावेळी जितकं मला फाईट करता आलं तेवढं मी केलं.
'मुलीच मुलींचे कपडे ओढत होत्या'
टास्कमध्ये जेव्हा फिझिकल व्हायचे तेव्हा मला खूप त्रास व्हायचा. मग ते अंगावर चढून कपडे ओढणं वैगरे फारच वाईट असायचं. मुलीच मुलींचे कपडे ओढत होत्या, मुलीच मुलींना काहीतरी बोलत होत्या. ते फार वाईट होतं. पण या सगळ्या अनुवभवातून मी खूप खंबीर झाले आहे, असंही योगिताने म्हटलं आहे.
सगळे निक्कीच्या हाताखाली कामं करतात - योगिता चव्हाण
योगिताने एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये निक्की, अरबाज, वैभव आणि जान्हवी यांच्या टीमविषयी बोलताना म्हटलं की, मला त्या दुसऱ्या टीममधलं कुणीच नाही आवडत. कारण त्या टीममध्ये कुणीही एकट्याने आणि स्वत:साठी खेळत नाही. तिथे निक्की मनाने सगळी सूत्र हलवते. तिचा एक हुकुमशाहीपणा तिथे आहे आणि बाकी सगळे तिच्या हाताखाली कामं करतात. ती तिचा खेळ बरोबर खेळते पण हे इतरांनाही कळायला हवं.