Yashoda - Goshta Shyamchya Aaichi: 'यशोदा गोष्ट श्यामच्या आईची' मालिकेचा शेवटचा एपिसोड येणार प्रेक्षकांच्या भेटीस; वीरेंद्र प्रधान पोस्ट शेअर करत म्हणाले, 'टीआरपी नाही हे कारण...'
वीरेंद्र प्रधान (Virendra Pradhan) यांनी नुकतीच 'यशोदा गोष्ट श्यामच्या आईची' (Yashoda - Goshta Shyamchya Aaichi) या मालिकेबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
Yashoda - Goshta Shyamchya Aaichi: छोट्या पडद्यावरील 'यशोदा गोष्ट श्यामच्या आईची' (Yashoda - Goshta Shyamchya Aaichi) ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या मालिकेचा शेवटचा एपिसोड 19 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रसिद्ध लेखक, क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि निर्माते वीरेंद्र प्रधान (Virendra Pradhan) यांनी नुकतीच यशोदा या मालिकेबद्दल एक खास पोस्ट शेअर केली आहे.
वीरेंद्र प्रधान यांची पोस्ट
वीरेंद्र प्रधान यांनी फेसबुक या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, "यशोदा गोष्ट श्यामच्या आईची, शेवटचा भाग 19 ऑगस्ट संध्याकाळी 6 वाजता, झी मराठी वर. टीआरपी नाही हे कारण नक्कीच आहे , मालिका वेळेआधी संपवण्यामागे.'
'उंच माझा झोका, स्वामिनी , यशोदा या गोष्टी मला पूर्ण करता आल्या नाहीत. टीआरपी नाही हेच कारण होते दरवेळी . लोकमान्य , सावित्री ज्योती आणि अशा अनेक मालिका या कारणास्तव लवकर संपल्या' अशी खंत देखील वीरेंद्र प्रधान यांनी या पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली.
त्यांनी पुढे पोस्टमध्ये लिहिलं,'टीआरपी मिळवण्यासाठी आम्हाला ही बर्याचदा अशा गोष्टी लिहाव्या लागतात , ज्या बऱ्याचदा आम्हाला लेखक म्हणून पटत नाहीत . वाहिन्या ही अशा गोष्टी आणण्यासाठी कायम प्रयत्नशील असतात . म्हणून मी , ही मालिका बंद होतेय हा कांगावा करणार नाही . आपल्या महाराष्ट्रात काय उत्तम साहित्य नाही ? आहे . दर्दी वाहिन्या नाहीत ? आहेत . आपले भारतीय शास्त्रीय संगीत , नाट्य संगीत , भावगीते , कविता , आपले पेहराव , ऋचा परवचा , संध्याकाळ ची शुभंकरोती , दिवाळी पहाट , किर्तन , लेझिम , टाळ मृदुंग , भूपाळी , काकड आरती , पदस्पर्श नमस्कार , खाडिलकर , गडकरी , पुल देशपांडे , बहिणाबाई , संत एकनाथ , साने गुरुजी , नामदेव ढसाळ, सुर्वे , शिरवाडकर ,लक्ष्मण गायकवाड ,विश्वास पाटील , शिवाजी सावंत , प्रकाश नारायण संत .. हजारो लाखो गोष्टी आहेत , ज्या आपल्या मुलांसमोर यायला हव्यात. महाराष्ट्रात आपल्याच या ठेवी दुर्मिळ आणि मलूल होत चालल्या आहेत . आणि काही वर्षात त्या नामशेष होणार , असा आपला प्रवास सुरु आहे . त्यातल्या त्यात आपापल्या कुवती नुसार , काही लोक हे टिकवण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहेत पण त्यांची शक्ती कमी पडतेय. हे कुणा एका दुग्ग्याच काम नाही . समाज ( टीआरपी ) सोबत लागतो . राज्यकर्ते इकडे फारसे लक्ष देणार नाहीत . त्यांची टेन्शन्स वेगळी आहेत . आणि का आपण कुणावर अवलंबून रहावं ? अगदी तो राजा असला तरी , का आपण एकाच व्यवस्थेच्या माथी हा वरवंटा फोडावा ? ही व्यवस्था कोण आणि का बनवतं ? आपण . अशा मालिका ही आपण बंद करतो आणि अशी सिस्टीम ( व्यवस्था ) ही आपण निवडून देतो . किती घरात अजून लोक साने गुरुजींची पुस्तके वाचतात , आपल्या मुलानं वाचायला देतात ? किती लोक आपले शास्त्रीय संगीत , नाट्य संगीत , भावगीते , बडबडगीते ऐकतात आणि आपल्या मुलांना ऐकवतात ?