Varsha Usgaonkar : 'बिग बॉस मराठी'च्या घरात दिसणार? ‘सुख म्हणजे...मालिका सोडण्याचे कारण वर्षा उसगांवकरांनी स्पष्टच सांगितले
Varsha Usgaonkar : वर्षा उसगांवकर या आता पुढील आठवड्यापासून सुरू होणाऱ्या बिग बॉस मराठीमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा रंगली होती. आता, स्वत: वर्षा उसगांवकर यांनी यावर थेट भाष्य केले आहे.
'कलर्स मराठी वाहिनी'वर 28 जुलैपासून बिग बॉस मराठी या रिएल्टी शोचा पाचवा सीझन सुरू होणार आहे. जवळपास दोन वर्षांनी बिग बॉस मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. त्यातूनच यंदाच्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार, याबाबतही चर्चा सुरू आहेत.
‘सुख म्हणजे नक्की काय असतं!’ या मालिकेतून वर्षा उसगांवकर यांनी निरोप घेतल्यानंतर त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली होती. आता, यावर वर्षा उसगांवकर यांनी मौन सोडत थेट भाष्य केले आहे. मुंबई टाईम्ससोबत बोलताना वर्षा उसगांवकर यांनी ‘सुख म्हणजे नक्की काय असतं!’ मालिका सोडण्याचे कारण सांगितले.
‘सुख म्हणजे नक्की काय असतं!’ मालिका का सोडली?
वर्षा उसगांवकर यांनी सांगितले की, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं!’ मालिकेत मी साकारत असलेल्या व्यक्तीरेखेला पुढे वाव नसल्याचे मला आणि निर्मात्यांना माहित होते. त्यामुळे मालिका सोडण्याचा निर्णय हा सामंजस्याने घेण्यात आला होता. या मालिकेत नायक-नायिकेसोबत दोन खलनायिका या व्यक्तीरेखांना वाव असल्याचे त्यांनी सांगितले. या व्यक्तीरेखेच्या आधारे मालिकेची कथा पुढे जाईल, पण मी साकारत असलेल्या व्यक्तीरेखेचे पुढं काहीच होऊ शकत नाही म्हणून मी मालिकेतून निरोप घेतला असल्याचे वर्षा उसगावंकर यांनी सांगितले.
'बिग बॉस मराठी'मध्ये सहभागी होणार?
मालिका सोडल्यामुळे वर्षा उसगावंकर या बिग बॉस मराठीच्या घरात दिसणार असल्याची चर्चा होती. त्यावर त्यांनी भाष्य करत म्हटले की, मी ‘बिग बॉस’च्या घरात जाणार नाही. ही कल्पना कुणाच्या डोक्यातून आली माहीत नाही, पण ती अफवा असल्याचेही वर्षा उसगांवकर यांनी म्हटले.
वेब सीरिजमध्ये झळकणार...
येत्या काळात आपण दोन वेब सीरिजमध्ये दिसणार असल्याचे वर्षा उसगांवकर यांनी सांगितले. या वेब सीरिजनंतर चित्रपटांकडे वळणार असल्याचेही वर्षा उसगांवकर यांनी सांगितले. हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम करण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.‘सुख म्हणजे नक्की काय असतं!’ सारख्या आशयाची मालिकेची ऑफर झाल्यास नक्कीच त्यात काम करायला आवडेल असेही त्यांनी म्हटले.