Tuja Maja Sapan : प्राजक्ताने चक्क बैलाबरोबर केलं शूटिंग; अभिनेत्रीच्या धाडसाचं मालिकाप्रेमींकडून होतंय कौतुक
Tuja Maja Sapan : 'तुजं माजं सपान' या मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ताने चक्क बैलाबरोबर शूटिंग केलं आहे. अभिनेत्रीच्या धाडसाचं मालिकाप्रेमींकडून कौतुक होत आहे.
Tuja Maja Sapan : 'तुजं माजं सपान' (Tuja Maja Sapan) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेचं वेगळं कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. पण सध्या ही मालिका एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. मालिकेतील नायिका प्राजक्ताने चक्क बैलाबरोबर शूटिंग केलं आहे. अभिनेत्रीच्या या धाडसाचं सध्या मालिकाप्रेमींकडून कौतुक होत आहे.
एका वेगळ्या धाटणीची कलाकृती व त्यातून जपली जाणारी सामाजिक आणि कौटुंबिक बांधिलकी यांचं उत्तम उदाहरण म्हणजे 'तुजं माजं सपान' ही सोनी मराठीवरील मालिका. प्रेक्षकांनी उचलून धरलेली ही गावाकडची गोष्ट त्यांना आपलीशी वाटण्याचं कारणच मुळात त्याच्या विषयात आहे. नावीन्यपूर्ण विषय आणि त्याला साजेशी कलाकारांची साथ, या मालिकेला उजवं ठरवते.
क्षेत्र मग ते कुठलंही असो स्त्रिया आपली आवड आणि कर्तव्यं यांची सांगड अगदी लीलया घालताना दिसतात. 'तुजं माजं सपान' ही मालिका हेच अधोरेखित करते आहे. सामान्य घरातील प्राजक्ताला रांगड्या मर्दानी खेळाचं, कुस्तीचं पडलेलं स्वप्नं आणि तिला पहिलवान वीरूची असलेली भक्कम साथ यांची अनोखी कथा 'तुजं माजं सपान' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
View this post on Instagram
प्राजक्ताने एका प्रसंगाचे चित्रण चक्क बैलाबरोबर केले
पैलवान प्राजक्ता आपला नवरा वीरेंद्र याच्यासोबत आपल्या संसाराची गाडी पुढे ढकलते आहे. ती आपले स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी स्वतःचे ठाम असे मत मांडते आहे. मालिकेच्या चित्रीकरणाबरोबरच ती आपल्या व्यायामाकडेही लक्ष देते आहे. मालिकेत वेगळं काहीतरी करण्यासाठी नेहमीच प्रयत्न सुरू असतात. मालिकेत आपण पहिले असेलच की नुकतेच तिने ट्रक अपघाताचे चित्रण उत्तमरीत्या पार पाडले. त्यासाठी ती चक्क ट्रकखाली झोपली होती.
मालिकेच्या एका प्रसंगात प्राजक्ताला एका पिसाळलेल्या बैलापासून शाळेतील मुलांना वाचवायचे आहे. या प्रसंगादरम्यान तिने चक्क बैलाबरोबर चित्रीकरण केले. प्राण्यांबरोबर चित्रण करताना तशी योग्य ती काळजी घेतली जातेच. प्राण्यांच्या कलाने चित्रण करावे लागते. पण असे आव्हानात्मक प्रसंगांचं चित्रण करताना कलाकारांना धोकादायक परिस्थितीचा सामना करत चित्रण करावे लागते. यातून प्राजक्ताची जिद्द आपल्याला पाहायला मिळते कारण दुखापत होऊनदेखील तिने तो प्रसंग पूर्ण केला आणि आपले चित्रीकरण पूर्ण केले.
सचिन गोस्वामींकडून प्राजक्ताचं कौतुक
सचिन गोस्वामी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत प्राजक्ताचं कौतुक केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे,"तुजं माजं सपान'मालिकेतील नायिका पैलवान प्राजक्ता ही मुळातच एक कुस्तीपटू आहे..साताऱ्यातील एका गावात, शेतकरी कुटुंबात वाढलेली प्राजक्ता आता एक यशस्वी आणि प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री झाली आहे.. आमच्या वेटक्लाउड प्रॉडक्शन्स च्या या 'तुजं माजं सपान' या दैनंदिन मालिकेत नुकतच एक साहस दृश्य चित्रित झालं. यात एका उधळलेल्या बैलाला प्राजक्ता शिताफीने काबूत आणते आणि शाळकरी मुलांचा जीव वाचवते".
सचिन गोस्वामी यांनी पुढे लिहिलं आहे,"या चित्रीकरणाच्या निमीत्ताने प्राजक्ताच्या धडाडीचे कौतुक वाटले. अनोळखी प्राण्या सोबत चित्रीकरण हे अत्यंत जिकिरीचे काम. त्यात उधळलेला बैल सावरणे. त्यासाठी अनेकदा प्रत्येक शॉट साठी त्या बैला सोबत अभिनय करायचा हे सगळं कठीण काम प्राजक्ताने अगदी सहजतेने केलं. या मागे तिचं गावात, शेतात,विविध प्राण्यांच्या सोबत घालवलेल्या काळाचा अनुभव कमी आला..प्राजक्ता ही खूप चांगली अभिनेत्री तर आहेच पण कुस्तीपटू आणि शेती कन्या आहे..प्राजक्ताच्या या धाडसाचे कौतुक आणि तिच्या मातीशी घट्ट असलेल्या नात्याचा आदर वाटतो.. प्राजक्ता तुला खूप शुभेच्छा".
संबंधित बातम्या