TMKOC Gurucharan Singh Missing Case : 10 पेक्षा जास्त अकाउंट, धार्मिकतेकडे ओढा;'तारक मेहता...'च्या बेपत्ता सोढीचे काय झालं? समोर आली अपडेट
TMKOC Gurucharan Singh Missing Case : गुरुचरण सिंह बेपत्ता प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुचरण यांची 10 हून अधिक बँक अकाउंट्स सापडली आहेत.
TMKOC Gurucharan Singh Missing Case : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेत रोशन सिंह सोढी ही व्यक्तीरेखा साकारणारे अभिनेते गुरुचरण सिंह (Gurucharan Singh) हे 22 एप्रिल पासून बेपत्ता आहेत. दिल्ली पोलिसांसह गुरुचरण सिंह यांचा मित्रपरिवारही त्यांचा शोध घेत आहे. मात्र, सुरुवातीला सीसीटीव्ही फूटेज मध्ये दिसणाऱ्या गुरुचरण सिंह यांचा कोणताही थांगपत्ता लागला नसल्याचे दिसून येते.
गुरुचरण सिंह यांच्या प्रकरणात नवी अपडेट
गुरुचरण सिंह बेपत्ता प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुचरण यांची 10 हून अधिक बँक अकाउंट्स सापडली आहेत. एवढेच नाही तर त्याच्याकडे एकापेक्षा जास्त जीमेल अकाऊंट असल्याचेही समोर आले आहे. जवळचे लोक आणि डिजिटल तपासानंतर पोलिसांना सापडलेल्या तथ्यांवरून गुरुचरणचा धर्माकडे कल वाढत असल्याचे समोर आले. त्याने एका डोंगरावर जाण्याची इच्छा खास मित्राकडे व्यक्त केली असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. शेवटच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये गुरुचरण सिंह हे ई-रिक्षातून पायी जाताना दिसत होते.
22 एप्रिलपासून अभिनेता बेपत्ता
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या तपासात गुरुचरण यांच्याबाबत कोणताही सुगावा लागला नाही. गुरुचरण 22 एप्रिलला मुंबईला पोहोचणार होते. विमानतळावर ज्या व्यक्तीला भेटणार होते, त्यांचीही दिशाभूल करण्यात आली. अखेरच्या वेळी गुरुचरण यांनी एटीएममधून 14 हजार रुपये काढले होते. त्यानंतर कोणतीही माहिती उपलब्ध नाही. सध्या पोलीस प्रत्येक अँगलने या प्रकरणाचा तपास करत आहेत.
गुरुचरण कधी भेटणार? कुटुंबीयांची आर्त साद
अभिनेता गुरुचरण सिंह बेपत्ता झाल्याची बातमी 26 एप्रिल रोजी समोर आली होती. त्यांच्या वडिलांनी गुरुचरण बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत केली होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुचरण 24 एप्रिलपर्यंत दिल्लीत होते. यानंतर त्याचा मोबाईल बंद झाला. तो लवकरच लग्न करणार होता अशीही माहिती आहे. दरम्यान, ते आर्थिक संकटातूनही जात होते. अभिनेता लवकरात लवकर घरी सुखरुप परतावे, हीच चाहत्यांची आणि कुटुंबीयांची प्रार्थना आहे.
'तारक मेहता का...'मध्ये महत्त्वाची भूमिका
'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये गुरुचरण सिंह यांनी रोशन सिंग सोढीची भूमिका साकारली होती. या व्यक्तिरेखेद्वारे त्यांनी नेहमीच लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणले. ते नेहमीच पार्टी मोडमध्ये असणारे पात्र होते. पण पत्नीवरचे प्रेम व्यक्त करण्यास तो कधीच मागे हटत नाही. शो मधील सर्वात लोकप्रिय पात्रांपैकी एक होता. गुरुचरण सिंह यांनी 2020 मध्ये हा शो सोडला.