Mahaminister : आज रंगणार 'महामिनिस्टरचा' महाअंतिम सोहळा; महाराष्ट्राला पाहायला मिळणार 11 लाखांची पैठणी
Mahaminister : 'महामिनिस्टर' या कार्यक्रमाचा आज महाअंतिम सोहळा पार पडणार आहे.
Mahaminister : दार उघड वहिनी म्हणत महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण भारतातील तमाम वहिनींचा महाराष्ट्राचं महावस्त्र पैठणी देऊन बांदेकर भाऊजी आणि होम मिनिस्टर हा कार्यक्रम गेली 18 वर्ष सन्मान करत आला आहे. होम मिनिस्टरचं नवं पर्व 'महामिनिस्टर'देखील (Mahaminister) प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं.
'महामिनिस्टर' या कार्यक्रमाचं 'महामिनिस्टर' हे पर्व तमाम वहिनींच्या भेटीस आलं आणि प्रचंड गाजलं. 11 लाखांच्या पैठणीसाठी महाराष्ट्रातील 10 शहरांमध्ये चांगलीच चुरस रंगली. अहमदनगरच्या अपेक्षा पवार, पनवेलच्या सोनाली पाटील, ठाण्याच्या सुवर्ण पेंढारे, नाशिकच्या डॉ. रुपाली पाखरे, औरंगाबादच्या शरयू पाटील, रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे, पुण्याच्या कावेरी मत्रे, कोल्हापूरच्या सलोनी येवलेकर, सोलापूरच्या सपना रंगदाळ, नागपूरच्या निवेदिता गुरुभेले या वहिनींनी त्यांच्या शहरात 1.25 लाखाच्या पैठणीचा मान मिळवला आणि आता या 10 जणींमध्ये 11 लाखांच्या पैठणीसाठी जबरदस्त सामना रंगणार आहे.
'महामिनिस्टर' या पर्वाच्या सुरुवातीपासूनच 11 लाखांच्या पैठणीची चर्चा सर्वत्र सुरू होती. सोन्याची जर आणि हिरे जडवलेली ही पैठणी पाहण्याचा क्षण आता जवळ येऊन ठेपला आहे. कुठलं शहर या पैठणीचा मान पटकावणार? महाराष्ट्राच्या महापैठणीची मानकरी ठरणार कोणती नगरी? हे प्रेक्षकांना रविवारी महाअंतिम सोहळ्यात पाहायला मिळेल. या महाअंतिम सोहळ्यानंतर सोमवार 27 जून पासून होम मिनिस्टरचं 'खेळ सख्यांचा चारचौघींचा' हे नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या पर्वात वहिनी त्यांच्या आवडत्या ग्रुप म्हणजेच महिला मंडळासोबत सहभागी होऊ शकतात.
View this post on Instagram
'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाने 18 वर्ष प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन केलं आहे. या 18 वर्षांच्या प्रवासात कुठेही खंड पडला नाही. लॉकडाऊनमध्येदेखील होम मिनिस्टरने घरच्या घरी वहिनींना पैठणीचा मान दिला आहे. यावर्षी महामिनिस्टरच्या रूपाने एक महास्पर्धा प्रेक्षकांसाठी सादर झाली. महाराष्ट्रभर हा पैठणीचा खेळ रंगला आणि 11 लाखांची पैठणी जिंकण्याची चुरस प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
संबंधित बातम्या