Suraj Chavan : आई मरीमाता... झापुक झुपुक, गुलीगत धोका देत सूरज चव्हाण बिग बॉस विजेता; कसा होता प्रवास?
Suraj Chavan Bigg Boss Winner : बिग बॉसच्या घरातही यायला तयार नसलेला सूरज चव्हाण आता विजेता ठरला आहे तर अभिजीत सावंत रनर अप ठरला.
मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या बिग बॉसच्या पाचव्या सीजनचा निकाल लागला असून बारामतीचा सूरज चव्हाण विजेता ठरला आहे. सुरवातीपासून अनेकांची नाराजी ओढावून घेणारा, ज्याला बिग बॉसचा गेम समजत नाही अशी टीका होत असलेला सूरज चव्हाणने अखेर बाजी मारली. त्याच्याच शब्दात सांगायचं तर त्याला आई मरी माता पावली अन् त्याने पॉवर दाखवली.
कोण आहे सूरज चव्हाण?
मूळचा बारामतीचा असलेला सूरज चव्हाण हा टीकटॉकमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. सूरजचं वैयक्तिक आयुष्य हे फार खडतर गेलंय. सूरज लहान असतानाच त्याच्या आई-वडिलांनी जगाचा निरोप घेतला. घराची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याला केवळ आठवीपर्यंत शिक्षण घेता आलं. सूरजला पाच बहिणी असून त्याच्या मोठ्या बहिणीने सूरजचा सांभाळ केला.
बुक्कीत टेंगूळ, गुलीगत धोका अशा त्याच्या शब्दांमुळे आणि रील्समुळे सूरज चांगलाच फेमस झाला. त्यानंतर त्याला बिग बॉस मराठीची ऑफर देण्यात आली. सुरुवातीला सूरज बिग बॉसच्या घरात यायला तयार नव्हता असं अनेकदा बिग बॉसच्या टीमकडून सांगण्यात आलं आहे. पण शेवटी बिग बॉसच्या टीमने त्याला घरात येण्यासाठी तयार केलं. त्यानंतर आता सूरजने थेट बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.
टॉप 6 मधून सूरजने मारली बाजी
निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण हे बिग बॉस मराठीचे फायनलिस्ट होते. यामध्ये आधी जान्हवी किल्लेकर ही नऊ लाख रुपये घेऊन त्यानंतर अंकिता वालावलकर घराबाहेर पडल्या. टॉप चार स्पर्धकांमधून धनंजयला माघार घ्यावी लागली. त्यामुळे सूरज, अभिजीत आणि निक्कीने टॉप 3 मध्ये धडक दिली. यामध्ये सूरजने बाजी मारत टॉप 2 मध्ये स्थान मिळवलं. अखेर प्रेक्षकांनी निर्णय देत सूरजला बिग बॉस मराठीचा विजेता केलं.