जे घडणार तेच ती बोलणार... ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ नवी गूढ मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!
Satvya Mulichi Satvi Mulgi : ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील नायिका नेत्राला भविष्यात काय घडणार हे दिसतं. त्यामुळेच गावातली सामान्य मुलगी असूनही, ती असामान्य ठरलीय.
Satvya Mulichi Satvi Mulgi : आपल्याला नेहमीच भविष्यकाळात काय घडणार, या विषयी कुतूहल असतं आणि भविष्य आपल्याला दिसू लागलं तर त्याचं आश्चर्यच वाटेल. अगदी असंच ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ (Satvya Mulichi Satvi Mulgi) मालिकेतील नेत्राच्या आयुष्यात घडलंय. नेत्रा भविष्यात जे घडणार आहे, त्याबद्दल बोलते. पण, लोक तिला समजून न घेता तिच्यावर दोषारोप करतात. त्यामुळे नेत्राला प्रत्येक वेळी नव्या आव्हानाला सामोरं जावं लागतं. अशा या नेत्राची गोष्ट लवकरच झी मराठी वाहिनीवर पहायला मिळणार आहे.
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील नायिका नेत्राला भविष्यात काय घडणार हे दिसतं. त्यामुळेच गावातली सामान्य मुलगी असूनही, ती असामान्य ठरलीय. नेत्राला साक्षात त्रिनयना देवीनेच भविष्य पाहू शकण्याचं वरदान दिलंय. नेत्राला तिच्याकडील या दिव्यशक्तीचा वापर समाजाच्या भल्यासाठी करायचा आहे. परंतु, तिला भविष्य दिसत असलं, तरी तिचं आयुष्य सोपं नाही. तिला अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं. अशी ही नेत्रा वर्तमानातील आयुष्य जगताना भविष्याचा वेध कसा घेते, हे पाहणं उत्कंठा वाढवणारं असणार आहे.
पाहा प्रोमो :
या मालिकेचं सादरीकरण गूढ रहस्यमय पद्धतीने करण्यात येणार असून, मानवी भावभावनांचे, नातेसंबंधांचे अनोखे पैलू यात उलगडले जाणार आहेत. नुकताच या मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये मालिकेचं कथानक नेमकं काय असणार, याची झलक पाहायला मिळते आहे. यात काही गावकरी एका मुलीवर अनेक आरोप करताना दिसत आहेत. तिने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या होत असल्याने तिला दुषणे दिली जात आहेत. मात्र, आपली नात शापित नसून, खुद्द देवीने तिला आशीर्वाद दिला आहे, असे तिचे आजोबा सांगतात. तर, आपण होणाऱ्या घटना सांगत नसून, जे घडणार आहे तेच सांगत आहे, असे ती मुलगी म्हणते.
‘हे’ कलाकार मुख्य भूमिकेत
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत तितिक्षा तावडे आणि अजिंक्य ननावरे हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसंच, या मालिकेत ऐश्वर्या नारकर, मुग्धा गोडबोले,रजनी वेलणकर, अजिंक्य जोशी, जयंत घाटे, राहुल मेहेंदळे हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतील. किरण बिडकर आणि अभिराम रामदासी हे या मालिकेचे लेखक आहेत. तर, मालिकेची निर्मिती आयरिस Production (विद्याधर पाठारे) यांनी केली आहे. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही गूढ रहस्यमय मालिका 12 सप्टेंबर पासून रात्री 10.30 वाजत झी मराठीवर पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा :