Dnyaneshwar Mauli : 'ज्ञानेश्वर माउली' मालिकेत उत्कर्ष शिंदे साकारणार संत चोखामेळा
Dnyaneshwar Mauli : 'ज्ञानेश्वर माउली' या मालिकेत उत्कर्ष शिंदे संत चोखामेळांच्या भूमिकेत दिसून येणार आहे.
Dnyaneshwar Mauli : 'ज्ञानेश्वर माउली' (Dnyaneshwar Mauli) या मालिकेने प्रेक्षकांना संतांची परंपरा उलगडवत भक्तिरसात तल्लीन केलं आहे. माउली आणि त्यांची भावंडं यांचे चमत्कार, रेड्यामुखी वेद, श्रीसार्थ ज्ञानेश्वरी, विश्वरूप दर्शन, पसायदान अशा अनेक गोष्टी प्रेक्षकांना विशेष भावल्या आहेत. आता या मालिकेत उत्कर्ष शिंदे (Utkarsh Shinde) संत चोखामेळांच्या भूमिकेत दिसून येणार आहे.
अलौकिक हरिभक्तीच्या प्रवासाचे प्रेक्षक साक्षीदार झाले आहेत. 'ज्ञानेश्वर माउली' मालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. माउली, त्यांची भावंडं, इतकंच नव्हे तर मालिकेत माउलींच्या कार्याला विरोध करणारे विसोबा या व्यक्तिरेखांवरही प्रेक्षकांनी प्रेम केलं. पण आता मालिकेत विविध संतांची मांदियाळी अनुभवायला मिळत असताना यात आणखी एका संताची एन्ट्री होणार आहे.
मालिकेतील संतांच्या प्रवासाची सुरुवात संत कान्होपात्रा यांच्या येण्याने झाली आहे. माउलींच्या चमत्काराबरोबरच संतांच्या चमत्कारांची पर्वणीही प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन करत आहे. संत चोखामेळा या पात्राची मालिकेत एन्ट्री होणार असून या भूमिकेत उत्कर्ष शिंदे झळकणार आहे.
View this post on Instagram
पतितांना तारणारे व उपेक्षितांची र्कैफियत देवापुढे तळमळीने मांडणारे संत म्हणून संत चोखामेळा यांच्याकडे पाहिले जाते. या भूमिकेतून छोट्या पडद्यावर उत्कर्षला पाहणे प्रेक्षकांना रंजक ठरणार आहे. अंगावर गोंघडीचे शिवलेले वस्त्र, हातात काठी अशा मोहक रूपात उत्कर्ष असेल. त्याच्या या लूकची प्रेक्षकांमध्ये नक्कीच चर्चा होईल, यांत शंकाच नाही. त्याच्या या आध्यात्मिक भूमिकेसाठी त्याने विशेष मेहनत घेतली आहे. विठ्ठलाचा निस्सीम भक्त असलेला चोखामेळा आणि ज्ञानेश्वर माउली यांचे संबंध नेमके कसे होते हे पाहणे प्रेक्षकांना उत्सुकतेचे ठरेल.
संत ज्ञानेश्र्वरांच्या प्रभावळीतले संत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'संत चोखामेळा' यांचा प्रवास प्रेक्षकांना 'ज्ञानेश्वर माउली' या मालिकेत पाहायला मिळणार आहे. दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर निर्मित ही मालिका गेले अनेक महिने प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन करते आहे. माऊलींचे चमत्कार, त्यांनी केलेलं गीता पठण यातून प्रेक्षकांना ज्ञानेश्वरांबद्दलची माहिती मिळाली. मालिकेत दाखवली गेलेली गोष्ट प्रेक्षकांना भावली आणि म्हणूनच प्रेक्षकांच्या मनात मालिकेनी स्थान निर्माण केलं.
संबंधित बातम्या