Marathi Serial : 'देवीच्या मंदिरातच जेव्हा...,'स्टार प्रवाहच्या ‘उदे गं अंबे...'मालिकेतील अभिनेत्रीचा अनुभव
Marathi Serial : स्टार प्रवाहच्या ‘उदे गं अंबे...कथा साडे तीन शक्तिपीठांची’ मालिकेत आदिशक्तीचं रुप साकारणाऱ्या अभिनेत्री मयुरी कापडणे हिने तिचा दैवी अनुभव सांगितला आहे.
Marathi Serial : स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवर येत्या 11 ऑक्टोबरपासून ‘उदे गं अंबे… कथा साडे तीन शक्तिपीठांची’ ही पौराणिक मालिका सुरु होणार आहे. प्रेक्षकही या मालिकेची आतुरतेने वाट पाहत असल्याचं चित्र सध्या आहेत. नवरात्रौत्सवाच्या धामधुमीत महाराष्ट्राची श्रद्धास्थानं म्हणजेच साडे तीन शक्तिपीठांची गोष्ट ही मालिका उलगडणार आहे. अभिनेत्री मयुरी कापडणे या भव्यदिव्य मालिकेत आदिशक्तीची रुपं साकारणार आहे. मयुरीची देवीवर प्रचंड श्रद्धा आहे. योगायोगाने कोल्हापुरच्या अंबाबाईचं दर्शन घेत असतानाच मयुरीला आदिशक्तीचं रुप साकारण्यासाठी विचारणा झाली.हा अनुभव मयुरीने नुकताच शेअर केला आहे.
आदिशक्तीचं स्वरूप विराट आणि विश्वाकार आहे. ती जगतजननी आहे. भक्तांच्या हाकेला धावून जाणारी भक्तांची तारणहार आहे आणि म्हणूनच साडेतीन शक्तिपीठांचा महिमा अपार आहे. याच साडे तीन शक्तिपीठांची सविस्तर भावगर्भ आणि भक्तिरसपूर्ण कहाणी म्हणजे 'उदे गं अंबे…कथा साडे तीन शक्तिपीठांची’ ही महामालिका असल्याचं सांगण्यात येत आहे.
मयुरीने सांगितला तिचा अनुभव
मयुरीला कोल्हापुरच्या अंबाबाईचं दर्शन घेत असतानाच आदिशक्तीचं रुप साकारण्यासाठीची विचारणा झाली होती. हा दैवी अनुभव असल्याची भावना मयुरीने व्यक्त केली. तिने म्हटलं की, मी पहिल्यांदाच पौराणिक मालिकेत काम करतेय. सगळ्यात महत्त्वाचं माहुरची देवी रेणुका, कोल्हापुरची देवी अंबाबाई, तुळजापुरची देवी भवानी, वणीची देवी सप्तशृंगी, सती, पार्वती ही देवीची वेगवेगळी रुपं मी साकारणार आहे. मी जेव्हा स्वत:ला देवीच्या रुपांमध्ये पाहिलं तेव्हा माझाच माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.हा देवीचाच आशीर्वाद आहे असं मला वाटतं
पण आपल्या कुटुंबासाठी पूजनीय असलेल्या या आईसमान देवीचं महात्म्य आणि इतिहास सर्वांना माहित असतोच असं नाही. तो इतिहास सविस्तरपणे आणि रोचक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न उदे गं अंबे...कथा साडे तीन शक्तिपीठांची या भव्यदिव्य पौराणिक मालिकेतून करण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांची कोठारे व्हिजन्स प्रायव्हेट लिमिटेड ही निर्मिती संस्था या भव्य मालिकेची निर्मिती करणार आहे.