(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Marathi Serial Updates Atisha Naik : अतिशा नाईक पुन्हा एकदा होणार खलनायिका, 'या' नव्या मालिकेत साकारणार भूमिका
Marathi Serial Updates Atisha Naik : अतिशा नाईकने नायिका ते खलनायिका अशा विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. आता अतिशा नाईक पुन्हा एकदा नव्या मालिकेत झळकणार आहे.
Marathi Serial Updates Atisha Naik : रंगभूमी ते टीव्ही मालिका, चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचे नाणे खणखणीत वाजवणारी अभिनेत्री म्हणून अतिशा नाईकची (Atisha Naik) ओळख आहे. छोट्या पडद्यावर मागील काही वर्षांमध्ये अतिशा नाईकने आपली छाप सोडली आहे. अतिशा नाईकने नायिका ते खलनायिका अशा भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. आता अतिशा नाईक पुन्हा एकदा नव्या मालिकेत झळकणार आहे. 'स्टार प्रवाह' वाहिनीवर सुरू होत असलेल्या 'येड लागलं प्रेमाचे' (Yed Lagla Premach) या मालिकेत अतिशा नाईक खलनायिका भूमिका साकारणार आहे.
येत्या 27 मे पासून स्टार प्रवाहवर 'येड लागलं प्रेमाचं' ही नवी मालिका सुरू होत आहे. पंढरपुरच्या मातीत रंगलेली रांगडी प्रेम कहाणी अभुनवण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. उत्कंठावर्धक कथानकासोबतच दिग्गज कलाकारांची फौज या मालिकेत असणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री अतिशा नाईक या मालिकेत खलनायिका व्यक्तीरेखा साकारणार आहेत. शशीकला असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. कोणाचही भलं झालेलं या शशीकलाला आवडत नाही. प्रत्येकाबद्दलचं तिच्या मनात एक असूया आहे. अभिनेत्री होण्याचं शशीकलाचं स्वप्न होतं. मात्र हे स्वप्न अधुरच राहिलं. त्यामुळे नटण्याची तिला प्रचंड आवड आहे.
भूमिका साकारताना कस लागला...
अतिशा नाईकने आपल्या नव्या भूमिकेबाबत सांगितले की, स्वार्थी, अप्पलपोटी आणि पैशांचा माज दाखवणारी अशी ही शशीकला साकारताना अभिनेत्री म्हणून कस लागला आहे. मी आजवर अनेक खलनायिका साकारल्या. मात्र शशीकलाची व्यक्तीरेखा वेगळी आहे. तिची घरात प्रचंड दहशत आहे. तिच्या पेहरावातून, चालण्यातून, बोलण्यातून याची कल्पना येते. मला खात्री आहे शशीकलाचा अंदाज प्रेक्षकांना नक्कीच भावेल असा विश्वास अतिशा नाईकने व्यक्त केला. शशीकलाचा मालिकेतली मुख्य नायिका म्हणजेच मंजिरीवर विशेष राग आहे. मंजिरी या घरात नसती तर एव्हाना शशीकलाने संपूर्ण घर आपल्या नावावर करुन घेतलं असतं. मंजिरीच्या सुरळीत होणाऱ्या गोष्टींमधे अडचणी आणून त्या कुटुंबाची कोंडी करायची हे काम शशीकला नेटानं करत असते.
'बिग बॉस'फेम अभिनेत्याची मालिकेत एन्ट्री
'बिग बॉस मराठी'फेम (Bigg Boss Marathi) लोकप्रिय अभिनेता जय दुधाणे (Jay Dudhane) स्टार प्रवाहच्या 'येड लागलं प्रेमाचं' (Yed Lagla Premach) या मालिकेत झळकणार आहे. मालिकेत तो इन्सपेक्टर जय घोरपडेच्या भूमिकेत दिसणार आहे. रिअॅलिटी शोज गाजवलेला लोकप्रिय अभिनेता जय दुधाणे इन्सपेक्टर जय घोरपडेची भूमिका साकारणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच पोलिसाची व्यक्तिरेखा साकारत आहे.
'येड लागलं प्रेमाचं' ही नवी मालिका 27 मे पासून रात्री 10 वाजता स्टार प्रवाहवर सुरू होणार आहे.