Sharmishtha Raut : शर्मिष्ठा राऊतने चाहत्यांना दिली गुडन्यूज; पोस्ट शेअर करत म्हणाली,"आमचं पहिलं बाळ"
Sharmishtha Raut : अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने नव्या इनिंगला सुरुवात केली आहे.
Sharmishtha Raut : मराठमोळी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut) सध्या चर्चेत आहे. आजवर शर्मिष्ठा वेगवेगळे नाटक, सिनेमे आणि मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आता तिने नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
शर्मिष्ठाने लिहिलं आहे,"आमचं पहिलं बाळ 'तुला शिकवेन चांगलाच धडा' (Tula Shikvin Changlach Dhada) आतापर्यंत एक अभिनेत्री म्हणून प्रवास सुरुच आहे. पण आता त्याचबरोबर निर्मिती म्हणून नविन प्रवास सुरू केला आहे. अभिनेत्री म्हणून तसेच माणूस म्हणूनदेखील तुम्ही रसिक प्रेक्षकांनी कायम मला साथ दिली आहे. आता या पुढच्या नविन प्रवासासाठी तुमचे आशिर्वाद कायम आमच्यासोबत असू दे...". शर्मिष्ठाच्या या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री ते निर्माती; शर्मिष्ठा राऊतचा प्रवास जाणून घ्या...
'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेच्या माध्यमातून शर्मिष्ठा घराघरांत पोहोचली आहे. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. अनेक दिवस मालिकेचं शूटिंग केल्याने शर्मिष्ठाने काही काळासाठी मालिकेतून ब्रेक घेतला होता. त्यानंतर दोन वर्षांनी 'बिग बॉस मराठी'च्या माध्यमातून शर्मिष्ठाने छोट्या पडद्यावर जोरदार कमबॅक केलं. छोट्या पडद्याच्या माध्यमातून चाहत्यांनी शर्मिष्ठाला ती एक कलाकार म्हणून कशी आहे आणि माणूस म्हणून कशी आहे ते पाहिलं आहे.
छोट्या पडदा गाजवायला शर्मिष्ठा सज्ज
अभिनेत्री म्हणून छोटा पडद्यावर झळकल्यानंतर निर्माती म्हणून छोट्या पडदा गाजवायला शर्मिष्ठा सज्ज झाली आहे. शर्मिष्ठाच्या नव्या निर्मिती संस्थेचं नाव 'एरिकॉन टेलिफिल्म्स' असं आहे. गेल्या काही दिवसांपासून शर्मिष्ठाने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकल्याची चर्चा होती. पण या मालिकेचं नाव मात्र गुलदस्त्यात होतं.
शर्मिष्ठाने 'तुला शिकवेन चांगलाच धडा' या मालिकेच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. शर्मिष्ठाची ही निर्माती म्हणून पहिलीच मालिका असल्याने या प्रवासात तिला तिचा नवरा तेजसदेखील मदत करणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो आऊट झाला आहे. प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून चाहते आता मालिकेची प्रतीक्षा करत आहेत. या मालिकेत शिवानी रांगोळे आणि अभिनेता ऋषी शेलार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
संबंधित बातम्या