(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jui Gadkari : अभिनेत्री जुई गडकरीचं टेलिव्हिजनवर दमदार कमबॅक; ‘ठरलं तर मग’ मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Jui Gadkari : 'ठरलं तर मग' या मालिकेतून प्रेक्षकांना आपलीशी वाटणारी नवी गोष्ट आणि नवी पात्र भेटीला येणार आहेत.
Jui Gadkari : स्टार प्रवाह वाहिनी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला एक नवी मालिका घेऊन येत आहे. ‘ठरलं तर मग’ (Tharla Tar Mag) असं या मालिकेचं नाव असून मराठी अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) या मालिकेत महत्वाची भूमिका साकारणार आहे. 'ठरलं तर मग' या मालिकेतून प्रेक्षकांना आपलीशी वाटणारी नवी गोष्ट आणि नवी पात्र भेटीला येणार आहेत. खऱ्या प्रेमाची साक्ष देणारी ही मालिका असणार आहे. 5 डिसेंबरपासून ही मालिका सुरु होणार आहे.
'ठरलं तर मग' मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना जुई म्हणाली, ‘ही मालिका करताना मला अतिशय आनंद होत आहे. माहेरी आल्याची भावना आहे. पुढचं पाऊल मालिकेतल्या कल्याणीवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. त्यामुळे या नव्या पात्रावरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतील याची खात्री आहे. सायली ही अतिशय समजूतदार आणि स्वतंत्र विचारांची मुलगी आहे. अनाथ असली तरी नात्यांचं महत्व जाणणारी, अन्याय सहन न करणारी मात्र प्रचंड वेंधळी अशी सायली आहे. सायलीच्या वेंधळेपणामुळेच मालिकेत मजेशीर प्रसंगही पाहायला मिळतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मालिकेची कथा ही मालिकेचं बलस्थान आहे. त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतेय की इतक्या छान प्रोजक्टचा मला भाग होता आलं.’
आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन्सने या मालिकेची निर्मिती केली असून सचिन गोखले या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत.
पुढचं पाऊल मालिकेतून घराघरांत पोहोचलेली कल्याणी
तर, स्टार प्रवाहवरील 'पुढचं पाऊल' या मालिकेतून कल्याणीच्या रुपात घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जुई गडकरी 'ठरलं तर मग' मालिकेतून सायलीच्या भूमिकेतून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन करणार आहे. पुढचं पाऊल या मालिकेने जुईला चांगली प्रसिद्धी मिळवून दिली. या मालिकेपासून तिचा चाहता वर्गही वाढला आहे. जुई गडकरी एका गंभीर आजाराने त्रस्त असल्यामुळे ती अनेक दिवस मालिका विश्वापासून दूर होती. मात्र, आता ती पुन्हा एकदा मालिका विश्वात दमदार पुनरागमन करणार आहे. त्यामुळे जुईची ठरलं तर मग ही मालिका नेमकी कशी असेल? याबाबत तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या 5 डिसेंबर पासून संध्याकाळी 08:30 वाजता प्रेक्षकांना ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
Sachin Tendulkar: 'अभिमानास्पद...'; प्रशांत दामलेंसाठी मास्टर ब्लास्टर सचिननं केली खास पोस्ट