(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'चं नवं पर्व लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 1 मिस्डकॉल द्या अन् जिंका 2 कोटी!
Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'चं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) या बहुचर्चित कार्यक्रमाचं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो आऊट झाला असून प्रेक्षकांमध्ये या कार्यक्रमाची चांगलीच उत्सुकता आहे. 1 मिस्डकॉल द्या आणि 2 कोटी जिंका असं म्हणत या कार्यक्रमाचा प्रोमो आऊट करण्यात आला आहे.
ज्ञान आणि बुद्धी यांच्या जोरावर करोडपती होण्याची अनोखी संधी देणार्या 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) या कार्यक्रमाचं नवीन पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या पर्वाचं वैशिष्ट्य म्हणजे विजेत्याला 2 कोटी रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे.
View this post on Instagram
करोडपती होण्याचं स्वप्न प्रत्येक जण पाहतो, पण सर्वसामान्यांचं हे स्वप्न सत्यात उतरण्याची संधी 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळते. 'कोण होणार करोडपती'च्या आधीच्या सगळ्या पर्वांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. मनोरंजनासोबत ज्ञानार्जन हे वैशिष्ट्य असणार्या या कार्यक्रमात ज्ञान तुम्हाला यशाच्या उत्तुंग शिखरावर घेऊन जाऊ शकतं याची प्रचिती मागील पर्वामुळे आली आहे.
सचिन खेडेकर सांभाळणार सूत्रसंचालनाची धुरा!
'कोण होणार करोडपती'च्या आगामी पर्वाच्या सूत्रसंचालनाची धुरा देखील सचिन खेडेकर (Sachin Khedekar) सांभाळणार आहेत. अभिनय कौशल्याबरोबरच सचिन खेडेकर सहभागी स्पर्धकांशी प्रेमळ संवाद साधून त्यांना दिलासा देण्याचं काम मोठ्या खुबीनी करतात. 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात सहभागी होण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल.
दरवर्षीप्रमाणे मिस्डकॉल देऊन किंवा सोनी लिव्ह ॲपवर जाऊन प्रेक्षक सहभागी होण्यासाठी नोंदणी करून घेऊ शकतात. यंदाच्या सिझनमध्ये काय वेगळेपण असेल, स्पर्धक कसे असतील, 2 कोटी रुपये कोणी जिंकू शकेल का; हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.
'कोण होणार करोडपती'चं (Kon Honar Crorepati) नवं पर्व कधीपासून सुरू होणार हे अद्याप समोर आलेलं नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये या पर्वाची चांगलीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. मागच्या पर्वात सेलिब्रिटीदेखील खेळ खेळले होते. त्यामुळे या पर्वातदेखील सेलिब्रिटी खेळतील का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :