Ritiesh Deshmukh : 'मराठीला पहिल्यांदा "बिग बॉस" हा खेळ उमजलेला होस्ट लाभला', बिग बॉसच्या माजी स्पर्धकाची रितेश देशमुखसाठी खास पोस्ट
Bigg Boss Marathi : अभिनेते आणि बिग बॉसच्या माजी स्पर्धकाने रितेश देशमुख याच्यासाठी खास पोस्ट केली आहे.
Bigg Boss Marathi : मराठी बिग बॉसच्या पाचव्या सिझनची (Bigg Boss Marathi New Season) सध्या बरीच चर्चा सुरु आहे. घरातील प्रत्येक गोष्टीसाठी होणारी भांडणं, राडे या सगळ्या गोष्टींमुळे मराठी बिग बॉसचा प्रेक्षकवर्ग वाढत असल्याचं चित्र सध्या आहे. त्यातच वीकेंडला रितेश देशमुख ज्या प्रकारे घरातल्या स्पर्धकांची शाळा घेतो ते पाहणं प्रेक्षकसांठी चांगलच मनोरंजन असतं. त्यामुळे रितेशच्या भाऊच्या धक्क्याच्याही उत्सुकतेने वाट पाहत असतात.
बिग बॉस मराठीची घोषणा झाली आणि पहिल्याच प्रोमोमध्ये प्रेक्षकांना एक धमाकेदार सरप्राईज मिळालं. रितेश देशमुख होस्ट म्हणून बिग बॉसच्या खुर्चीत बसला. त्यामुळे प्रेक्षकांमध्येही बरीच उत्सुकता निर्माण झाली. त्यातच रितेशचा भाऊचा धक्काही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या सगळ्यावर अभिनेते आणि बिग बॉस मराठीचे माजी स्पर्धक किरण माने यांनी लिहिलेली पोस्ट सध्या बरीच चर्चेत आली आहे.
किरण माने यांनी काय म्हटलं?
किरण माने यांनी रितेशसाठी लिहिलेल्या खास पोस्टमध्ये म्हटलं की, 'कुणाविषयी कुठलाही पुर्वग्रह डोक्यात न ठेवता अत्यंत बॅलन्स्ड पद्धतीनं बिग बॉस होस्ट करतो आहेस. मराठीला पहिल्यांदा बिग बॉस हा खेळ उमजलेला होस्ट लाभला आहे. आक्रस्ताळेपणा नाही, पर्सनल आवडीनिवडीवरुन कुणावर उगाचंच चिखलफेक नाही. केवळ 'स्वत:ला आवडतात म्हणून' न खेळणार्या निष्क्रीय लोकांना डोक्यावर घेणे नाही.सगळं जिथल्या तिथं. जसं आहे तसं. आरशासारखं. लख्ख.'
पुढे त्यांनी म्हटलं की, 'मुळात तू स्वत: 'माणूस' म्हणून नितळ आहेस. तो नितळपणा तुझ्या सुत्रसंचालनात उतरला आहे. बिग बॉस हा खेळ मानसिकतेचा आहे. विपरीत परिस्थिती निर्माण करून माणसाचं 'व्यक्तीमत्त्व' परखण्याचा आहे, याची जाणीव सतत तुला असते, ही तुझी 'युनिक' क्वॉलिटी आहे. बिग बॉस हे असं 'रामायण' आहे, ज्यात एकाच माणसात असलेली राम-रावण-सीता-कैकेयी-लक्ष्मण-बिभिषण-भरत-दशरथापास्नं हनुमानापर्यन्त सगळी व्यक्तीमत्त्वं बाहेर पडतात. बिग बॉस कधी कुणातली कैकेयी भारी ठरते,तर कधी कुणी बिभिषण ठरतो.'
'माणूसपणाची कसोटी पहाणारा अद्भूत डाव सुरू होतो. यावेळी यांना खेळवणारा, झुलवणारा, चकवणारा, झुंजवणारा आणि फुलवणारा जादूगार फार महत्त्वाचा असतो... रितेश देशमुखच्या रूपानं यावेळी सिझन पाचला असा भन्नाट 'खेळीया' लाभलाय, ज्यानं या सिझनला चार चांद लावलेत !रितेशभौ, 'बिगबॉस' माझ्यासाठी काय आहे हे तुला माहिती आहे. मला जीवदान देणारा ऑक्सीजन आहे तो. कुणी निंदा कुणी वंदा, पण माझा जीव आहे या शो वर. तू ज्या पद्धतीनं हा शो होल्ड केलास ते पाहून तुझा खूप अभिमान वाटायला लागलाय. हा सिझन जर नव्या उंचीवर गेला, तर त्यात सिंहाचा वाटा हा तुझ्यातल्या निर्मळ 'माणसा'चा असेल.
लब्यू', अशी खास पोस्ट त्याने लिहिली आहे.