(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kavita Lad : रंगभूमीवर शेवटचं वाक्य आहे असं वाटलं, प्रयोगानंतर रडू कोसळलं; कविता लाड यांच्यासोबत काय झालं?
Kavita Lad Latest News : रंगभूमीवरून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री कविता लाड-मेढेकर यांनी रंगभूमीवरील आपला अनुभव सांगितला.
Kavita Lad : मागील अनेक वर्षांपासून अभिनेत्री कविता लाड-मेढेकर (Kavita Lad Medhekar) या रंगभूमीवर काम करत आहेत. रंगभूमीवरून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री कविता लाड-मेढेकर या आता छोट्या पडद्यावर सक्रिय आहेत. झी मराठी वाहिनीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेत कविता लाड या भुवनेश्वरी ही व्यक्तीरेखा साकारत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या झी नाट्य गौरव पुरस्कार 2024 सोहळ्याच्या निमित्ताने कविता लाड यांनी रंगभूमीवरील आपला अनुभव सांगितला.
अभिनेत्री कविता लाड यांनी रंगभूमीवरील अनुभवाबाबत सांगितले की, नाटक ही माझी आवडती कला आहे. रंगभूमीवर मला अभिनयाची गोडी लागली. पहिल्या मुलाच्या वेळेस गरोदर असताना मी नाटकात काम न करण्याचा निर्णय घेतला होता. नाटकासाठी प्रयोगाचे दौरे होतात. त्या दरम्यान मला बरे वाटत नसेल तर मी नाटकात कसे काम करणार हा प्रश्न होता. चित्रपटाच्या शूटिंगचे दिवस पुढे मागे करता येऊ शकतात. मात्र, नाटकाच्या बाबतीत असे करता येऊ शकत नाही. त्यामुळे नाटकातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे कविता मेढे यांनी सांगितले.
अन् रंगभूमीवर रडू कोसळले...
View this post on Instagram
कविता लाड यांनी सांगितले की, मी त्यावेळी ‘एका लग्नाची गोष्ट’ नाटकात काम करायचे तेव्हा मी नाटकाचे निर्माते सुधीर भट यांना नाटक सोडणार असल्याबाबत सांगितलं. गरोदर असताना पाचव्या महिन्यात मी काम थांबवण्याचा निर्णय घेतला. ‘एका लग्नाची गोष्ट’चा शेवटचा प्रयोग करायचं मी ठरवलं. पुणे येथे चिंचवडला तो प्रयोग होता. त्या प्रयोगादरम्यान तिसरी घंटा झाली. रंगभूमीवर एन्ट्री करण्यापूर्वी माझ्या मनात विचार आला, आज मी जी एन्ट्री घेतेय ती माझी शेवटची एन्ट्री आहे. यानंतर मी कधी पुन्हा रंगभूमीवर येईन हे मला माहित नव्हतं. पुढचा काळ मला माहित नव्हता. मी एंट्री घेऊन पहिलं वाक्य म्हटलं आणि प्रत्येक वाक्यानंतर मला असं वाटत होतं की, मी हे शेवटचं वाक्य बोलत आहे. मला नाटकातून सुट्टी हवी होती, विश्रांती हवी होती. नाटक संपेपर्यंत माझ्याबरोबरच्या सगळ्या मंडळींना हे जाणवलं की हा माझा शेवटचा प्रयोग आहे. नाटकाचा पडदा पडल्यानंतर मला खूप रडू कोसळले. मला हे अचानक रडू का कोसळले हे कळलंच नाही असे कविता लाड यांनी सांगितले.
रंगभूमीवर कमबॅक करताना मनात धाकधूक होती असेही त्यांनी सांगितले. मुंबईतील शिवाजी मंदिरातील प्रयोगाच्या वेळी प्रेक्षक कसा प्रतिसाद देतील याची धास्ती होती. मात्र, एन्ट्री घेतल्यानंतर प्रेक्षक माझ्या बाजूने असून त्यांना मला रंगभूमीवर पाहायचे होते असे जाणवले. रंगभूमीवर काम करायला मिळतंय आणि शेवटपर्यंत काम करत राहिल असेही कविता लाड यांनी सांगितले.