Gunaratna Sadavarte : 'ठाकरे-पवारांचं सरकार पाडण्यासाठीच 6 महिने एसटीचं आंदोलन केलं', बिग बॉसच्या घरात सदावर्ते काय म्हणाले?
Gunaratna Sadavarte : उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं सरकार पाडण्यावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी बिग बॉसच्या घरात एक मोठं वक्तव्य केलं आहे.
Gunaratna Sadavarte : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) हे सध्या बिग बॉसच्या घरामध्ये (Bigg Boss 18) गेल्याने त्यांची जोरदार चर्चा सुरु आहे. पण असं असलं तरीही महाराष्ट्रासाठी काही हे नावं नवं नाही. अनेक मुद्द्यांमुळे गुणरत्न सदावर्ते यांचं नाव कायमच चर्चेत राहिलं आहे. मराठा आरक्षणाविरोधातली याचिका असो किंवा एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व असो या सगळ्यामुळे सदावर्ते हे नाव माध्यमांमध्येही बरंच गाजलं. पण आता बिग बॉसच्या घरातच गुणरत्न सदावर्ते यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही सरकारी सेवेत घ्यावं, त्यांच्याप्रमाणेच वेतन मिळावे, प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक, वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक, अशा अनेक मागण्यांसह एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हा संप जवळपास सहा महिने सुरु होता. मुंबईतील आझाद मैदानावर सुरु असलेल्या या संपाचं नेतृत्व गुणरत्न सदावर्ते, गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी केलं होतं. याच एसटी संपामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं सरकार पडलं असल्याचं मोठं वक्तव्य नुकतच गुणरत्न सदावर्ते यांनी बिग बॉसच्या घरात केलं आहे.
गुणरत्न सदावर्ते यांनी काय म्हटलं?
बिग बॉसच्या घरात इतर सदस्यांना सांगताना गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं की, उद्धव ठाकरेंचं सरकार पाडण्यासाठी सहा महिने मी एसटी आंदोलनाची मोहीम राबवली. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं खच्चीकरण झालं आणि त्यांचं सरकार पडलं. त्यानंतर शिंदे फडणवीसांचं सरकार सत्तेत आलं. या सगळ्याची चर्चा अमेरिकेतही झाली.
मुंबईत फक्त तीनच घरं - गुणरत्न सदावर्ते
मुंबईत तुम्ही कुठे राहता असा प्रश्न घरातील इतर सदस्यांनी गुणरत्न सदावर्ते यांना यावेळी विचारला. तेव्हा गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं की, 'मी मुंबईत दादरमध्ये राहतो.. हिंदमाताला आणि मुंबईत फक्त तीनच घरं आहेत.. एक उद्धव ठाकरे, दुसरं शरद पवार यांचं आणि तिसरं गुणरत्न सदावर्ते याचं.. एक गुणरत्न लाख गुणरत्न असं मला म्हणतात...'