Aai Tulja Bhawani Marathi Serial :'आई तुळजाभवानी' आणि महालक्ष्मी दोन सख्यांची होणार भेट, मालिकेत पुन्हा रंगतदार वळण
Aai Tulja Bhawani Marathi Serial : आई तुळजाभवानी मालिका सध्या रंजक वळणावर असून आई तुळजाभवनी आणि महालक्ष्मी या दोन सख्यांची भेट होणार आहे.
Aai Tulja Bhawani Marathi Serial : कलर्स मराठी (Colors Marathi) वाहिनीवरील आई तुळजाभवानी (Aai Tulja Bhawani) ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. ही मालिका दिवसागणिक प्रेक्षकांच्या देखील पसंतीस उतरत असल्याचं पाहायला मिळतंय. मालिकेत नुकतचं खंडेरायाच्या म्हाळसाने आई तुळजाचं महाराष्ट्रात स्वागत केलेलं पाहायला मिळालं. तसंच म्हाळसाच्या सोबतीने तुळजाभवानी गावकऱ्यांवर आलेलं संकट दूर करताना दिसून आली. अशातच आता मालिकेत पुन्हा एकदा एक रंगतदार वळण आलं आहे. कारण आता मालिकेत 'आई तुळजाभवानी' आणि महालक्ष्मी या दोन सख्यांची भेट होणार आहे.
सध्या मालिकेत लक्ष्मी तुळजा भवानीला मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताची कहाणी सांगताना दिसणार आहे. तसेच असूराच्या अत्याचारामुळे सगळे हैराण झाले आहेत. लोकांना आता कशावरही विश्वास नाही. त्यांचा हरवलेला विश्वास परत मिळवून द्यायला आणि त्यांना सुखाचे दिवस दाखवायला तुळजा महाराष्ट्रात आल्याचं लक्ष्मीला सांगते.
तुळजा लक्ष्मीला तिच्या भक्तांना मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी भक्तिभावाने तिचं पूजन करायला सांगते. तसेच भविष्यात ते व्रत माझ्या आणि सगळ्याच आदिशक्तीच्या भक्तांना फलदायी ठरणार असल्याचं सांगते. पुढे भवानी तिचे आभार मानते आणि त्या व्रतामुळे लोकांमध्ये समृद्धी येईल याची ग्वाही देते. पहा ‘आई तुळजाभवानी’ दररोज रात्री 9 वा. फक्त कलर्स मराठीवर.
अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी 'आई तुळजाभवानी'ची गाथा या मालिकेच्या माध्यमातून उलगताना पाहायला मिळत आहे. 'आई तुळजाभवानी'ची भूमिका अभिनेत्री पूजा काळे साकारत आहे. पूजा काळे ही भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने विशारद पूर्ण केलं आहे. तसेच कथ्थकचंही शिक्षण तिने घेतले आहे.
'आई तुळजाभवानी' मालिकेतील मुख्य भूमिकेबद्दल पूजा काळेने प्रतिक्रिया देताना सांगितलं होतं की, "आई तुळजाभवानी'ची भूमिका साकारताना आसपास खूप सकारात्मक ऊर्जा जाणवतेय. पहिली मालिका आणि आव्हानात्मक भूमिका साकारणं ही एक मोठी जबाबदारी आहे. प्रेक्षकांच्या विश्वासाला सार्थ उतरेन".
View this post on Instagram