Bigg Boss Marathi : सूरज चव्हाणच्या विजयानंतर प्रेक्षकांकडून पॅडीला कौतुकाची थाप; 'पॅडी दादा हे तुमच्यामुळे शक्य झालं', प्रेक्षकांनी मानले आभार
Bigg Boss Marathi Season 5 : सूरज चव्हाण बिग बॉस मराठी 5 विजेता झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याचं श्रेय पॅडी कांबळेलाही दिलं आहे.
Bigg Boss Marathi Season 5 : महाराष्ट्राचा लाडका सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला आहे. सूरज चव्हाण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील विजेता असल्याने त्याच्यावर कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बिग बॉसच्या घरात सूरजच्या पहिल्या दिवसापासून साथ दिली आणि समजून घेतलं, ते पॅडी उर्फ पंढरीनाथ कांबळे याने. पॅडी दादा बिग बॉसच्या घरात सूरजसाठी 'बापमाणूस' ठरला. पॅडीने सूरजला टास्कसह आयुष्यातील संकटाना सामोरं जाण्यासाठीही प्रोत्साहित केलं. पॅडी बिग बॉसच्या घरात सूरजचा मूळ आधार होता. याचं जणू बापलेकाचं नातंच बनलं होतं, जे प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरलं.
बिग बॉसची जिंकलेली ट्रॉफी जेव्हा सूरज पॅडीच्या हातात देतो
सूरज चव्हाणने बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर पॅडी दादाचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचं पाहायला मिळालं. ग्रँड फिनालेनंतर सूरजने बिग बॉस मराठीच्या विजेतेपदाची ट्रॉफी पॅडी दादाच्या हातात दिली. यावेळी दोघांच्या चेहऱ्यावरील भाव त्यांच्या मनातील त्यांची खास जागा दाखवत होते. यानंतर पॅडीने सूरजला कडकडून मिठी मारली. सूरजच्या विजयानंतर सोशल मीडियावर सूरजचं जितक्या शुभेच्छा मिळत आहेत, तितकंच कौतुक पॅडीचं सुरु आहे. पॅडीमुळेच सूरज विजेता होऊ शकला, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. यासाठी प्रेक्षकांपी पॅडीचे आभारही मानले आहेत.
सूरजच्या विजयाचं श्रेय पॅडीलाही
सूरज आणि पॅडी याची बिग बॉसमध्ये जमलेली जोडी प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेली आहे. या दोघांची मस्ती, प्रेम आणि आपुलकी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. सूरज चव्हाण बिग बॉस जिंकल्यावर पॅडी कांबळेने आनंद व्यक्त केला आहे. पॅडी कांबळे याने सूरज चव्हाणसाठी खास पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, या चेहऱ्यांवर आनंद आणि समाधान देणाऱ्या महाराष्ट्रातील संपूर्ण रसिक मायबाप प्रेक्षकांचे मनापासून आभार! त्याने सूरजसोबतचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
View this post on Instagram
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सूरज आणि पॅडीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने कमेंटमध्ये लिहिलंय, पॅडी दादा तुमचे खूप खूप आभार... देवमाणूस! दुसऱ्याने लिहिलंय, लेकराच्या विजयाचा बापाच्या चेहऱ्यावरील आनंद ! आणखी एकाने म्हटलंय, दोन खरी माणसं एकत्र. एकाने पॅडीचे आभार मानत म्हटलंय, पॅडी दादा हे तुमच्यामुळे शक्य झालं तुम्ही त्याला सांभाळून घेतलं नसतं, तर आज चित्र काही वेगळं असतं पण सुरज भले आज जिंकला आहे, त्याच्या विजयाच सगळं श्रेय हे फक्त आणि फक्त तुम्हाला जातं आणि हा तुमचा देखील विजय आहे.