(Source: Poll of Polls)
PETA Letter To Salman Khan : बिग बॉसच्या घरात बांधलेल्या गाढवामुळे सलमान खानच्या अडचणी वाढणार? PETA नं धाडलंय पत्र
Bigg Boss 18: PETA इंडियानं सलमान खान (Salman Khan) आणि रिअॅलिटी शो बिग बॉसच्या निर्मात्यांना मनोरंजनासाठी प्राण्यांचा वापर करू नये, अशी विनंती केली आहे.
Bigg Boss 18: बिग बॉसच्या अठराव्या सीझनला (Bigg Boss 18 Season) मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. सलमान खान (Salman Khan) होस्ट करत असलेल्या या बहुचर्चित रिअॅलिटी शोचा ग्रँड प्रिमीयर सोहळा गेल्या रविवारी पार पडला. यंदाच्या सीझनमध्ये देशभरातील या ना त्या कारणानं गाजलेल्या काही जणांसह, काही सेलिब्रिटी अशा 18 जणांना बिग बॉसच्या घरात बंद करण्यात आलं आहे. पण, बिग बॉसनं यंदाच्या सीझनमध्ये सर्व कटेस्टंटसोबत एक खास पाहुणा घरात पाठवला आहे. याच खास पाहुण्यामुळे सलमान खानच्या अडचणी वाढणार की काय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. बिग बॉसच्या घरात बंद करण्यात आलेला खास पाहुणा म्हणजे, गाढव (Donkey). हो... बरोबर ऐकलंत, बिग बॉसच्या घरात एक गाढव पाठवलं आहे.
PETA इंडियानं सलमान खान (Salman Khan) आणि रिअॅलिटी शो बिग बॉसच्या निर्मात्यांना मनोरंजनासाठी प्राण्यांचा वापर करू नये, अशी विनंती केली आहे. पेटा इंडियानं सलमान खान आणि रिॲलिटी शो बिग बॉसच्या निर्मात्यांना मनोरंजनासाठी प्राण्यांचा वापर करू नये, अशी विनंती केली आहे. दरम्यान, यावेळी 'बिग बॉस 18' मध्ये एका गाढवाला स्पर्धक म्हणून आणण्यात आलं आहे. त्याचं नाव गधराज, जे पाहण्याचा आनंद प्रेक्षक घेत आहेत. कुटुंबातील सर्व सदस्यांना मिळून या गाढवाचा सांभाळ करावा लागतो. दरम्यान, पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स उर्फ पेटान गाढवाला शोमध्ये ठेवण्यावरुन आक्षेप घेतला आहे.
पेटानं सलमान खानला थेट धाडलं पत्र...
PETA इंडिया ही सामाजिक संस्था प्राण्यांसाठी काम करते. प्राण्यांवर होणारे अन्याय, अत्याचाराविरोधात पेटा काम करतं, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ही एक गैर-सरकारी संस्था म्हणजेच एनजीओ आहे, जी समाजातील प्राण्यांवर होणारे अत्याचार थांबवण्याचं काम करत आहे. आता पेटा टीमनं अधिकृतपणे बिग बॉसच्या निर्मात्यांना पत्र लिहिलं आहे. बुधवारी पाठवलेल्या या पत्रात पेटानं शोमध्ये ठेवलेल्या गाढवावर आक्षेप घेतला आहे. गाढव शोमध्ये असल्याच्या तक्रारी त्यांना येत आहेत, असा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे. पेटानं होस्ट सलमान खानसह निर्मात्यांना मनोरंजनासाठी प्राण्यांचा वापर करण्यापासून रोखण्याची विनंती केली आहे.
PETA इंडियानं पत्रात लिहिलं आहे की, "यामुळे प्राण्यांवरील दडपण तर संपेलच, पण ते प्रेक्षकांसाठी एक उत्तम उदाहरण ठरेल. आम्ही तुम्हाला विनंती करतो की, वकील गुणरत्न सदावर्ते, ज्यांनी आपलं गाढव 'मॅक्स'ला शोमध्ये आणलं आहे, त्यांना गाढव पेटा इंडियाकडे सोपवण्याची विनंती करा. सुटका केलेल्या गाढवांसह आम्ही त्याला अभयारण्यात आश्रय देऊ. यामुळे वकिलांचे चाहतेही खूश होतील."
गाढव कळपात राहतं, सेटवरचा आवाज त्याच्यासाठी... : PETA
PETA इंडियानं पत्रात पुढे लिहिलं आहे की, "बिग बॉस हा विनोदी शो आहे, पण त्यात प्राण्यांचा वापर करणं, ही काही हसण्यासारखी गोष्ट नाही. गाढव हा नॅच्युरली नर्वस प्राणी आहे. त्याच्यासाठी आणि इतर प्राण्यांसाठी, शो सेटवरील दिवे, आवाज आणि त्याच्यासाठी गोंधळात टाकणारा, भीतीदायक आहेत. टीव्ही शोमध्ये प्राण्याला जागा नाही हे प्रेक्षकांना स्पष्ट झालं आहे, त्यामुळे छोट्या जागेत गाढव अडकलेलं पाहून त्यांना वाईट वाटतंय.
बिग बॉसमध्ये प्राण्याला आणण्याची पहिलीच वेळ नाही : PETA
PETA नं आपल्या पत्रात असा सल्ला दिला आहे की, गाढव हा सामाजिक प्राणी आहे आणि त्याचं कल्याण कळपात राहण्यातच आहे. सदावर्ते या गाढवाचा दुधाशी संबंधित संशोधनासाठी वापर करत असल्याच्या दाव्यावरही पेटानं प्रतिक्रिया दिली आहे. पेटा इंडियाच्या टीमनं स्पष्टीकरण दिलं आहे की, गाढव फक्त त्यांच्या मुलांसाठीच दूध तयार करतात. बिग बॉसमध्ये प्राण्याला आणण्याची ही पहिलीच वेळ नाही, असंही लिहिलं आहे. यापूर्वी एक कुत्रा, एक पोपट आणि एक मासा देखील या शोमध्ये स्पर्धक म्हणून आणण्यात आला आहे. दरम्यान, पेटानं हे पत्र सलमान खान, वायाकॉम 18 नेटवर्क आणि प्रॉडक्शन हाऊस बनिजय एशिया यांना लिहिलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :