Ashwini Kasar : ''मराठीत बोलली तर खटकलं, धमकीच देण्यात आली''; अभिनेत्रीला लोकल ट्रेनमध्ये धक्कादायक अनुभव
Ashwini Kasar : लोकल ट्रेनमध्ये समोरच्या महिला प्रवासीला आपल्या बाजूच्या आसनावर पाय ठेवू न दिल्याने अभिनेत्री अश्विनीसोबत वाद घालत धमकी देण्यात आली. अश्विनीने आपल्यासोबत घडलेला किस्सा हा इन्स्टाग्राम स्टोरीवर अपलोड केला आहे.
अभिनेत्री अश्विनी कासार ही रंगभूमी आणि छोट्या पडद्यावरील मालिकांमुळे चांगलीच लोकप्रिय झाली आहे. अश्विनी ही आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर सक्रिय असते. अश्विनीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लोकल ट्रेनच्या प्रवासा दरम्यान आलेला अनुभव शेअर केला आहे. अश्विनीने आपल्या स्टोरीमध्ये मुंबई पोलीस आणि रेल्वे पोलिसांनादेखील टॅग केले आहे.
अश्विनीने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये काय म्हटले?
अश्विनी कासारने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओत तिने मुंबई पोलीस आणि रेल्वे पोलिसांना टॅग केले आहे. आपल्या पोस्टमध्ये तिने म्हटले की, या बाईंचं नाव मला माहित नाही. ट्रेनमध्ये यांना माझ्या सीटवर पाय समोर ठेऊन बसायचं होतं. मी नकार दिल्यावर मला लाथ मारण्यात आली. भांडणात मी मराठी भाषा वापरली तर त्यांना त्याचाही प्रॉब्लेम होता. मी पब्लिक इमेज आहे हे कळल्यावर मला धमक्या देण्यात आल्या. माझा मुंबई पोलीस आणि रेल्वे पोलिसांवर पूर्णपणे विश्वास आहे.
अश्विनीला मुंबई लोकलमध्ये आलेल्या या अनुभवावर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. मुंबई लोकलमध्ये बेशिस्त प्रवाशांवर कारवाई करण्याची मागणी काहींनी केली आहे.
सध्या अश्विनी ही ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या सोनी मराठीवरील वाहिनीवरील मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
Instagram पर यह पोस्ट देखें
‘सावित्रीजोती’, ‘कमला’, ‘कट्टी बट्टी’, ‘मोलकरणी बाई – मोठी तिची सावली’ आदी मालिकांमध्येही महत्त्वाची भूमिका साकारली आहे.