Aai Kuthe Kay Karte : आईच्या साडीत सुद्धा ईशाला जाणवते मायेची ऊब; 'आई कुठे काय करते'च्या प्रोमोने वेधलं लक्ष
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' या मालिकेत लवकरच ईशाचा साखरपुडा पार पडणार आहे.
Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका आता रंजक वळणावर आली आहे. मालिकेत लवकरच ईशा आणि अनिशचा साखरपुडा पार पडणार आहे. दरम्यान अरुंधतीजवळ ईशा थोडी भावूक झाली आहे. आईच्या साडीत सुद्धा ईशाला मायेची ऊब जाणवत आहे.
'आई कुठे काय करते' या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून लग्नाचा ट्रॅक सुरू आहे. अरुंधतीच्या लग्नानंतर प्रेक्षकांना ईशाचा लग्नसोहळा पाहायला मिळणार आहे. मालिकेत या साखरपुड्याची जय्यत तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. ईशाने खारपुड्यासाठी तिच्या मनासारखी खरेदी केली आहे. दरम्यान अरुंधती तिचे राहिलेले कपडे घेण्यासाठी देशमुखांच्या घरी येते. त्यामुळे ईशा मात्र भावूक होते.
'आई कुठे काय करते' मालिकेच्या आगामी भागाचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये ईशा अरुंधतीसोबत बोलताना दिसत आहे. अरुंधती देशमुखांच्या घरी येऊन तिच्या राहिलेल्या साड्या बॅगमध्ये भरुन घेऊन जाण्याची तयारी करताना दिसत आहे. त्यावेळी ईशा तिच्या समोर बसलेली असून अरुंधतीला ती म्हणते,"आई तू तुझ्या सगळ्या साड्या घेऊन नको ना जाऊस. मला झोप लागत नाही तेव्हा मी तुझी एखादी साडी कवटाळून घेऊन बसते. तेव्हा पटकन झोप लागते."
View this post on Instagram
ईशाच्या या बोलण्याने अरुंधतीदेखील भावूक होते. त्यानंतर ती पुन्हा बॅग उघडते आणि तुला हवी ती साडी काढून घे असं इशाऱ्याने ईशाला सांगते. अरुंधतीच्या सांगण्यानुसार ईशादेखील तिला हवी असलेली साडी काढून घेते आणि तिला मिठी मारते. ईशा आणि अरुंधतीचा हा भावनिक ट्रॅक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा आहे.
'आई कुठे काय करते' या मालिकेत अरुंधती ही भूमिका मधुराणी प्रभूलकर या साकरतात तर अनिरुद्ध ही भूमिका मिलिंद गवळी हे साकारतात. तर संजना ही भूमिका अभिनेत्री रूपाली भोसले ही साकारते. आई कुठे काय करते या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.6 रेटिंग मिळाले आहे.