मराठी सिनेसृष्टीतला पहिला वहिला प्रयोग, तेजश्री प्रधान आणि सुबोध भावेचा सिनेमा नाट्यगृहात होणार प्रदर्शित
Subodh Bhave and Tejashree Pradhan : सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांचा ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ सिनेमाचा पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात भव्य प्रीमियर पार पडणार आहे.
Subodh Bhave and Tejashree Pradhan : मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच मराठी चित्रपट (Marathi Movie) नाट्यगृहात प्रदर्शित होणार आहे. सुबोध भावे (Subodh Bhave) आणि तेजश्री प्रधानचा (Tejshree Pradhan) ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ या चित्रपटाला हा मान मिळाला आहे. या चित्रपटाचा भव्य प्रीमियर 20 डिसेंबर 2024 रोजी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे पार पडणारआ आहे. या प्रिमिअरला तेजश्री आणि सुबोधची विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच प्रीमियरसाठी विनामूल्य प्रवेश असून नाट्यगृहातच तिकीट उपलब्ध होणार आहेत.
‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ हा चित्रपट लग्नसंस्थेवर आधारित असून, आधुनिक विचारसरणी यात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अथश्री आणि गायत्री ही दोन परस्परविरोधी स्वभावाची पात्रे एकमेकांना पहिल्यांदा भेटतात आणि त्यांच्या पहिल्या भेटीतून काही मजेदार काही भावनिक घटना घडतात. त्यांच्या विचारांच्या देवाण-घेवाणीतून काही रहस्ये देखील समोर येतात, ज्यामुळे कथा अधिक मनोरंजक बनते.
लेखकांन काय म्हटलं?
चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणतात, “मराठी चित्रपटांना चित्रपटगृहांमध्ये नेहमीच मर्यादित स्क्रीन मिळतात, त्यामुळे आम्ही काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला. नाट्यगृहात चित्रपट प्रदर्शित करणं हा एक आव्हानात्मक निर्णय आहे आणि हे आव्हान आम्ही पेललं आहे. या पद्धतीने आम्ही अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचू आणि त्यांना एक नवा अनुभव देऊ शकू. नाट्यगृहातील या भव्य प्रीमियरसाठी आम्ही खूप उत्सुक आहोत.
चित्रपटाचे निर्माते शेखर विठ्ठल मते यांनी म्हटलं की, हा चित्रपट प्रायोगिक तत्वावर असून पूर्वनियोजित नाटकांच्या खेळांना कोणत्याही प्रकारचा धक्का न लागू देता नाट्यगृहामध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याचा हा एक प्रयत्न आहे. तसेच यामुळे मराठी रसिक प्रेक्षकांना मराठी चित्रपट व नाटक या दोन्हीचा आस्वाद एकाच ठिकाणी घेता येईल ’’
‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ चित्रपटात प्रथमच प्रेक्षकांना सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची जोडी एकत्र पाहायला मिळणार आहे. या प्रमुख कलाकारांसोबत प्रदीप वेलणकर, मानसी मागिकर, संजय खापरे, आणि शर्मिष्ठा राऊत हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. शुभम फिल्म प्रॅाडक्शन निर्मित, आनंद दिलीप गोखले लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाचे शेखर विठ्ठल मते निर्माते आहेत.
ही बातमी वाचा :
Swapnil Joshi : मराठी,हिंदी नव्हे तर गुजराती सिनेमात पदार्पण, स्वप्नील जोशीचं चाहत्यांना खास गिफ्ट