सोनू सूदचं कुटुंब अडकलं; विमानाची भाडेवाढ पाहून कोरोनात मदत करणारा अभिनेता चांगलाच भडकला
करोना काळात लोकांच्या मदतीसाठी पुढे येताना दिसलेला अभिनेता सोनू सूदने x माध्यमावर व्हिडिओ शेअर करत इंडिगोने संकट काळात केलेल्या दरवाढीवर ताशेरे ओढले आहेत.

Sonu sood IndiGo crisis: देशभरात गेल्या 3-4 दिवसांपासून इंडिगो एअरलाइनच्या उड्डाणांमध्ये मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालीय. हजारो फ्लाइट्स रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. अनेक विमानतळांवर संताप अनावर झालेला दिसला. ग्राउंड स्टाफवर ओरडणारे, भिडणारे प्रवासी यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशा परिस्थितीत अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) आणि कॉमेडियन वीर दास (Veer Das) यांनी पुढाकार घेत ग्राउंड स्टाफच्या बाजूने आवाज उठवला आहे. संकटाच्या वेळी Indigo ने केलेल्या दरवाढीवर दोघेही कलाकार चांगलेच भडकलेत. करोना काळात लोकांच्या मदतीसाठी पुढे येताना दिसलेला अभिनेता सोनू सूदने x माध्यमावर व्हिडिओ शेअर करत इंडिगोने संकट काळात केलेल्या दरवाढीवर ताशेरे ओढले आहेत.
माझ्या कुटुंबालाही तासन्तास वाट पाहावी लागली’ - सोनू सूद
सोनू सूद यांनी X माध्यमावर एक व्हिडिओ शेअर करत सांगितले की त्यांच्या स्वतःच्या कुटुंबालाही फ्लाइटसाठी 4-5 तास प्रतीक्षा करावी लागली. तो म्हणाला, “इंडिगोच्या समस्या गेल्या 2-3 दिवसांपासून सुरु आहेत. माझं कुटुंब ट्रॅव्हल करत होतं, त्यांनाही तासन्तास थांबावं लागलं. काही फ्लाइट्स गेल्या, काही गेल्याच नाहीत. अनेकांचे कार्यक्रम रद्द झाले, लग्न समारंभ, मीटिंग्ज, इव्हेंट्स रद्द करावे लागले. लोक खूप त्रासले हे खरं आहे. पण दुःखाची गोष्ट म्हणजे लोक स्टाफवर कसे चिडत, ओरडत होते.”
तो पुढे म्हणाला, “प्रवाशांमध्ये फ्रस्ट्रेशन आहे, राग आहे हे मी समजतो. पण थोडं त्यांच्या जागी स्वतःला ठेवून बघा. तो स्टाफही आता हतबल झाला आहे. पुढे काय शेड्यूल आहे, त्यांनाही माहित नसतं. वरून येणारा मेसेज ते फक्त प्रवाशांना सांगतात. हे तेच कर्मचारी आहेत जे रोज आपली काळजी घेतात. त्यामुळे अशा संकटात त्यांच्या पाठिशी राहणं ही आपली जबाबदारी आहे.”
‘संकटात केलेली तिकीट दरवाढ म्हणजे सरळ सरळ शोषण’
सोनू सूदने एअरलाइन कंपन्यांच्या मनमानी दरवाढीवरही टीका केली. तो म्हणाला,"युद्ध असो किंवा संकट, आवश्यक गोष्टींच्या किंमती वाढवणे म्हणजे शोषणच आहे. हेच एअरलाइनसाठीही लागू होतं. ऑपरेशनल अडचणी असताना तिकीट दर 5-10 पट वाढवणे अतिशय चुकीचे आहे. सामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी दरांवर कडक मर्यादा असायला हव्यात. त्याही जास्तीत जास्त 1.5 ते 2 पटीपर्यंत असायला हव्यात."
"A delayed flight is frustrating, but remember the faces trying to fix it. Please be nice and humble to the IndiGo staff; they are carrying the weight of cancellations too. Let’s support them." @IndiGo6E pic.twitter.com/rd3ciyekcS
— sonu sood (@SonuSood) December 6, 2025
कॉमेडियन वीर दासचीही जोरदार टीका
कॉमेडियन वीर दास यांनीही इंडिगोच्या व्यवस्थापनावर निशाणा साधला. त्यांनी ट्वीट करत म्हटलं,“सीनियर मॅनेजमेंट CEO पासून VP पर्यंत सगळ्यांना प्रत्यक्ष एअरपोर्टवर कामासाठी तैनात केलं पाहिजे. वीज नसताना भीतीमध्ये काम करणाऱ्या ज्युनियर स्टाफ, केबिन क्रू आणि ग्राउंड स्टाफला एकट्याला या प्रचंड गोंधळाचा सामना करायला सोडून देणे योग्य नाही.”























