Video | शशांक केतकरचं 'झी मराठी'वर पुनरागमन; पाहा नव्या मालिकेचा प्रोमो
एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातूनच याची माहिती मिळाली आहे. जिथं तो एका नव्याकोऱ्या मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार असल्याचं स्पष्ट होत आहे.
मुंबई : काही कलाकार हे त्यांच्या भूमिकांसोबतच अनेक कारणांनी प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरुपी घर बनवून जातात. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेता शशांक केतकर. प्रेक्षकांचं प्रेम आणि आपुलकी मिळवणारा हा अभिनेता 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेनंतर आता पुन्हा एकदा 'झी मराठी' वाहिनीशी जोडला गेला आहे.
शशांकच्या एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातूनच याची माहिती मिळाली आहे. जिथं तो एका नव्याकोऱ्या मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार असल्याचं स्पष्ट होत आहे. 'पाहिले न मी तुला', असं त्याच्या आगामी मालिकेचं नाव आहे.
अखेर ‘83’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला
अवघ्या काही मिनिटांच्या या प्रोमो व्हिडीओमध्ये शशांक एका वेगळ्या आणि अगदी रुबाबदार भूमिकेमध्ये दिसत आहे. त्यामुळं आता त्याची ही भूमिका आणि आगामी मालिका नेमकी कोणती कथा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार याचीच उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. ही मालिका प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण करण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे शशांकसोबत दिसणारे दोन नवोदित कलाकारांचे चेहरे.
‘माझा होशील ना’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात आणि घराघरात पोहोचलेला, नकारात्मक भूमिकेतूनही प्रेक्षकांची दाद मिळवणारा डॉ. सुयश पटवर्धन म्हणजेच अभिनेता आशय कुलकर्णीही या नव्या मालिकेत दिसणार आहे. शिवाय तन्वी मुंडले हा एक नवा चेहराही शशांक आणि आशयसोबत झळकणार आहे. त्यामुळं ही मालिका पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आल्यापासूनच उत्सुकता शिगेला पोहोचवून गेली आहे.