Raj Thackeray : 'एकटं लढायला वाघाचं काळीज लागतं...', शिंदेंचा उपनेता मनसेच्या व्यासपीठावर;राज ठाकरेंवर केला कौतुकाचा वर्षाव
Raj Thackeray : शरद पोंक्षे यांनी ठाण्यात अविनाश जाधव यांच्यासाठी घेतलेल्या सभेमध्ये जोरदार भाषण केलं.
Raj Thackeray : राज ठाकरे (Raj Thackeray) कोणत्याही भानगडीत पडले नाहीत...त्यांनी युती केली नाही..एकटं लढायचं ठरवलं.. मानलं पाहिजे वाघाचं काळीज लागतं यासाठी, असं म्हणत शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी ठाण्यातील मनसेच्या सभेत जोरदार भाषण केलं. शरद पोंक्षे हे शिवसेना शिंदे गटाचे उपनेते आहेत. पण यंदाच्या विधानसभेत त्यांनी राज ठाकरेंसाठी काही सभा घेणार असल्याचं जाहीर केलं आहे.
या पहिल्याच सभेत त्यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर अगदी तिखट भाष्य केलं. इतकच नव्हे तर राज ठाकरे यांच्यावर त्यांनी कौतुकाचा वर्षाव केला. अविनाश जाधव हेच ठाण्यातून निवडून आले पाहिजेत असा निर्धारही त्यांनी यावेळी केला असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्याचप्रमणे त्यांनी राज ठाकरेंसाठी का सभा घेतल्या याचं कारणही या सभेतून सांगितलं आहे.
'हा माणूस महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आलाच पाहिजे...'
राज ठाकरे यांच्याविषयी बोलताना शरद पोंक्षे यांनी म्हटलं की, मी शिंदे गटाचा उपनेता आहे, नावापुरता आणि अजूनही मी त्याच पक्षात आहे...राजसाहेबांचे विचार, त्यांचा 10-12 वर्षांतली आंदोलनं हे सगळं पाहिल्यानंतर मला आतून असं वाटायला लागलं की, हा माणूस महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आलाच पाहिजे... महाराष्ट्राच्या 24 नंतरच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार निवडून आलेच पाहिजेत...निवडणुका आपण स्वतःला जिंकण्यासाठी लढाईच्या असतात.. मी शिवसेनेसारख्या पक्षातून कोणत्याही दुसऱ्या पक्षात ते गेले नाही किंवा घाईघाईही केली नाही.. त्यांनी वेळ घेतला..हिंदुत्वाचे संस्कार झाले होते...शिवसेनेतून बाहेर पडला आणि मग स्वतःचा पक्ष काढला...
'म्हणून ठरवलं की...'
राज ठाकरेंसाठी सभा घेण्याचं कारण सांगत शरद पोंक्षे यांनी म्हटलं की, 'जी बाळासाहेबांची विचारधारा होती, महाराष्ट्रात मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणं आणि जेव्हा देशाचा प्रश्न येईल तेव्हा हिंदूंच्या हितासाठी लढणं.. त्याच विचारसरणीच्या पायावर मनसेचा जन्म झाला..अठरा वर्षापासून एक माणूस महाराष्ट्राच्या हितासाठी धडपडतोय, जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र निर्माण करायचाय... हे मी सातत्याने त्यांच्या तोंडून ऐकतोय. ते स्वप्न साकार करण्याची वेळ आलीये...म्हणून ठरवलं की या निवडणुकीमध्ये काही सभा या मनसेसाठी आणि राज ठाकरे या माणसासाठी घ्याव्यात..हे मनापासून वाटलं आणि मी स्वत:हून फोन केला...'
'वाघाचं काळीज लागतं यासाठी...'
आमची अमेरिकेमध्ये भेट झाली होती. बऱ्याच भेटीगाठी होत होत्या आमच्या.. अजिबात इकडच्या तिकडच्या गप्पा नाही... माणूस आहे अमेरिकेमध्ये पण तिथे असूनसुद्धा मला ते फक्त शरीराने अमेरिकेत होते.. मनाने ते महाराष्ट्रातच होते..त्यांच्या डोक्यात फक्त महाराष्ट्र होता...त्यांच्या डोक्यामध्ये राजकीय पक्षांमुळे जो महाराष्ट्रामध्ये चोथा झालाय तेच होतं...राज ठाकरे कोणत्याही भानगडीत पडले नाहीत...त्यांनी युती केली नाही..एकटं लढायचं ठरवलं.. मानलं पाहिजे वाघाचं काळीज लागतं यासाठी, असं म्हणत शरद पोंक्षे यांनी राज ठाकरे यांच्यावर कौतुकाचा वर्षावर केला आहे.