Sharad Kelkar : जास्त सिनेमे बनवयाचे आणि थिएटर मिळत नाही म्हणून रडायचं, मराठी सिनेमावर शरद केळकरने मांडलं रोखठोक मत
Sharad Kelkar : शरद केळकरने नुकतच त्याच्या एका लेखामध्ये मराठी सिनेमांविषयी त्याचं रोखठोक मत मांडलं आहे.
Sharad Kelkar : मराठीत चांगले सिनेमे बनत नाही अशी प्रेक्षकांची आणि प्रेक्षक मराठी सिनेमाकडे वळत नाही, अशी कलाकारांची खंत अधिक तक्रार कायमच असते. याचविषयी अनेक कलाकार हे मुलाखतींच्या माध्यमातून त्यांची नाराजी व्यक्तही करत असतात. पण मराठी सिनेमात अशी परिस्थिती का आहे यावर अभिनेता शरद केळकरने (Sharad Kelkar) नुकतच भाष्य केलं आहे. मराठी जास्त सिनेमे बनवायचे आणि नंतर थिएटर मिळत नाही म्हणून रडत बसयाचं असं थेट त्याने म्हटलंय.
'लयं भारी या सिनेमातून अभिनेता शरद केळकर हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्यानंतर अनेक मराठी आणि हिंदी सिनेमातून शरद प्रेक्षकांच्या भेटीस आलाय.त्याच्या अनेक भूमिका या आजवर प्रेक्षकांना आवडल्या आहेत. नुकतच तो रानटी या सिनेमात झळकला होता. असं असतानाच शरदने नुकतच मराठी सिनेमाविषयीचं त्याचं रोखठोक मत मांडलं आहे.
'वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून...'
शरद केळकरने या लेखात म्हटलं की, वर्षाला 10 ते 12 मराठी चित्रपट हिट झाल्यास लोक पैसे लावण्यासाठी पुढे येतील. त्यावेळी तुमच्याकडे स्वातंत्र्य असेल, तेव्हा तुम्ही हक्काने पैसे मागून घ्या. संगीतकार अजय-अतुल मराठी असूनही आपल्या निर्मात्यांना परवडत नाहीत. कारण त्यांनी स्वत:ला सिद्ध केलंय. ते गुणवत्तेचे पैसे आकारत असतील, तर चुकीचे आहे. दोन ते तीन मोठे निर्माते एकत्र आल्यास तेही परवडू शकतात. वर्षात दर आठवड्याला दोन चित्रपट आले तर 104 सिनेमे होतात. यापेक्षा जास्त सिनेम बनवून काय करणार? कारण, सिनेमागृहे मिळवण्यासाठी हिंदी-दाक्षिणात्य चित्रपट हॉलिवूडपटांशीही आपली स्पर्धा आहे. सिनेमे वाढले तरी सिनेमागृहे तितकीच आहेत. जास्त सिनेमे बनवायचे आणि थिएटर मिळत नाही म्हणून रडायचे, याला काय अर्थ आहे. वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येऊन इंडस्ट्री मोठी करण्याचा प्रयत्न करायला हवा.
'तर मराठी सिनेमा हॉलीवूडपटांशी स्पर्धा करु शकेल'
शरदने म्हटलं की, सर्वांनी मिळून कमिशन बेसिसवर सिनेमे बनवायला हवेत. यामुळे सिनेमांची गुणवत्ता सुधारेल. जेणेकरुन हिंदी तसेच इतर कोणत्याशी भाषेतील सिनेमांशी आणि हॉलीवूडपटांशी मराठी सिनेमा स्पर्धा करु शकेल. आपल्याजवळ अप्रतिम पटकथाकार, कलाकार, तंत्रज्ञ आहेत; पण द्रष्टेपणा नाही. प्रेक्षकांजवळ तुमच्यापेक्षा जास्त चांगले पर्याय आहे. सिनेमा हा नाटकासारखा नसावा. कल्पनेच्या पलीकडच्या विश्वात प्रेक्षकांना घेऊन जावं. यासाठी बजेट हा एक मोठा घटक मराठीत आडवा येतो. दोन-तीन मोठे निर्माते एकत्र आल्यास बिग बजेट सिनेमे बनू शकतात. त्यामुळे जोखीमही कमी होईल.
'दोन वर्षांत तीनच चित्रपट हिट होत असतील...'
90 टक्के सिनेमे हे ओव्हर बजेट झाल्याने प्रोमोशन मार्केटिंगवर खर्च केला जात नाही. ही सर्वात मोठी चूक आहे. आजच्या काळात मार्केटिंग आणि प्रमोशन गरजेचं आहे. पुष्पा सारख्या सिनेमाची लोक वाट बघत असताना त्याचे जोरदार प्रोमोशनही करण्यात आले. लोकांपर्यंत सिनेमा पोहचवलाच नाही तर ते सिनेमागृहांत येणार कसे. आज ट्रान्झिट करण्याची वेळ आली आहे. आजपर्यंत जे करत आलो, तेच पुढे करता कामा नये. मराठी इंडस्ट्रीचे जगभर खूप नाव आहे, पण व्यावसायिकदृष्ट्या वाढ होत नाही. वर्षाला येणाऱ्या 100 हून अधिक सिनेमांपैकी वेड, बाईपण भारी देवा आणि नवरा माझा नवासाचा असे दोन वर्षांत तीनच चित्रपट हिट होत असतील तर कसे होणार? असाही प्रश्न शरदने या लेखात उपस्थित केला आहे.