बिग ब्लॉकबस्टर! रजनीकांत अन् शाहरूख खान पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर; मिथुन चक्रवर्ती दिसणार व्हिलनच्या भूमिकेत
Shah Rukh Khan to Share Screen With Rajinikanth: 'जेलर 2'मध्ये रजनीकांतसोबत शाहरूख खान करणार स्क्रिन शेअर. मिथुन चक्रवर्ती खलनायकाच्या भूमिकेत.

Shah Rukh Khan to Share Screen With Rajinikanth: सुपरस्टार रजनीकांत (Rajnikanth) यांचा 'जेलर' (Jailer) हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली. सध्या त्यांचा चाहतावर्ग या चित्रपटाच्या सिक्वेलच्या प्रतिक्षेत आहेत. प्रेक्षकवर्ग 'जेलर 2' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या तामिळ अॅक्शन थ्रिलर चित्रपटात मिथुन चक्रवर्तीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी अलिकडेच एका मुलाखतीत 'जेलर 2' संदर्भात मोठे खुलासे केले आहेत. मिथुन यांनी फक्त चित्रपटातील अनेक दिग्गज कलाकारांच्या कॅमिओची माहिती दिली नाही, तर शाहरूख खानही या चित्रपटाचा भाग असल्याचे उघड केले आहे. तसेच 'जेलर 2' या चित्रपटात आपली भूमिका काय असेल, याबाबतही माहिती मिथुन यांनी दिली.
सिटी सिनेमाला दिलेल्या मुलाखतीत मिथुन चक्रवर्ती यांनी अनेक खुलासे केले, "माझा पुढचा चित्रपट जेलर 2 आहे. या चित्रपटात सगळेच माझ्याविरोधात आहे", असं मिथुन चक्रवर्ती म्हणाले. यानंतर त्यांनी चित्रपटाच्या स्टारकास्टची माहिती देत सांगितले की, "रजनीकांत, मोहनलाल, शाहरूख खान, राम्या कृष्णन आणि शिवा राजकुमार ही सर्व पात्र माझ्याविरोधात आहेत", अशी माहिती त्यांनी दिली. या विधानातून त्यांनी 'जेलर 2' मध्ये शाहरूख खानच्या कॅमिओची अधिकृत माहिती दिली. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती खलनायकाच्या भूमिकेत दिसणार, हे स्पष्ट झाले आहे.
View this post on Instagram
जर असे झाले तर, 'जेलर 2'हा रजनीकांत आणि शाहरूख खान एकत्र स्क्रीन शेअर करणारा पहिला चित्रपट असेल. अनुभव सिन्हा दिग्दर्शिक रा.वन 2011 मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्यात रजनीकांतची 'चिट्टी' ही व्यक्तीरेखा होती. परंतु, रजनीकांत हे प्रत्यक्षात या चित्रपटात नव्हते. रोहित शेट्टी दिग्दर्शित चेन्नई एक्स्प्रेस हा चित्रपट 2013 साली प्रदर्शित झाला होता. दरम्यान, या चित्रपटात शाहरूख खानने लुंगी डान्स या गाण्याच्या माध्यमातून सुपरस्टार रजनीकांत यांना खास मानवंदना दिली होती.
दरम्यान, रजनीकांत यांचा 'जेलर' हा चित्रपट 2023 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात राम्या कृष्णन, विनायकन, तमन्ना भाटिया, सुनील आणि योगी बाबू हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये दिसले होते. तर, मोहनलाल, शिवा राजकुमार आणि जॅकी श्रॉफ यांनी या चित्रपटात कॅमिओ भूमिका साकारल्या होत्या. दरम्यान, 'जेलर 2' या चित्रपटात मोहनलाल आणि शिवाकुमार या दोघांचीही प्रमुख भूमिका आहेत. सध्या प्रेक्षकवर्ग या चित्रपटाची वाट पाहत आहेत.























