Pandit Shivkumar Sharma Passed Away : प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं निधन
Pandit Shivkumar Sharma Passed Away : जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं निधन झालं असून त्यांच्या जाण्यानं संगीत विश्वात पोकळी निर्माण झाली आहे.
Pandit Shivkumar Sharma Passed Away : जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा (Pandit Shivkumar Sharma) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. संतुर वाद्याला संगीत विश्वात वेगळी ओळख निर्माण करुन देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
1956 साली त्यांनी व्ही. शांताराम यांच्या 'झनक झनक पायल बाजे' या गाण्याला संगीत दिलं होतं. 1967 साली त्यांनी प्रसिद्ध बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया आणि ब्रिज भूषण काब्रा यांच्यासमवेत 'कॉल ऑफ द व्हॅली' ही ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध केली होती जी अप्लावधीच प्रसिद्ध झाली. हरिप्रसाद चौरसिया यांच्या साथीनं त्यांनी काही चित्रपटांना संगीतसुद्धा दिलं. त्याची सुरुवात 1980 साली 'सिलसिला' चित्रपटापासून झाली. या काळात या जोडगोळीने 'शिव-हरी' या नावानं संगीत दिलं. त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांपैकी काही चित्रपटांबाबत बोलायचं झालं तर, फासले (1985), चांदनी (1989), लम्हे (1991), डर (1993) हे आहेत.
पंडित शिवकुमार शर्मा यांना अनेक राष्ट्रीय तसेच, आंतरराष्ट्रीय सन्मान आणि पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना 1985 मध्ये बाल्टीमोर, संयुक्त राज्यची मानद नागरिकता सुद्धा मिळाली आहे. पंडित शिवकुमार शर्मा यांना सन 1986 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला ,सन 1991 साली पद्मश्री, तसेच 2001 मध्ये पद्म विभूषण या सन्मानानं पंडितजी यांना सन्मानित करण्यात आलं होतं.
पंडित शिवकुमार शर्मा यांचा जन्म 13 जानेवारी 1938 मध्ये झाला. ते मूळचे जम्मू येथील रहिवाशी. 1999 मध्ये त्यांनी रेडिफला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की, त्यांच्या वडिलांनी त्यांना वयाच्या पाचव्या वर्षापासूनच शास्त्रीय गायन आणि तबल्याचे धडे द्यायला सुरुवात केली होती. संतूर वादन करण्याची प्रेरणा त्यांना त्यांच्या आईकडून मिळाली. आईच्या इच्छेनुसार, त्यांनी संतूर वादनास सुरुवात केली. शिव कुमार यांनी वयाच्या तेराव्या वर्षापासून संतूर शिकण्यास प्रारंभ केला आणि आपल्या आईचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं. त्यांनी आपल्या वादनकौशल्याचं पहिलं सादरीकरण 1955 मध्ये मुंबईत केलं होतं. पंडित शिवकुमार शर्मा यांच्या जाण्यानं संगीत विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.