(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'हे तुमचं प्रोडक्शन हाऊस नाही...!' उशिरा येण्यावरुन समीर वानखेडेंनी अनन्या पांडेला फटकारलं
NCB update : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी अभिनेत्री अनन्या पांडे हिला चांगलंच फटकारलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
NCB update : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey)हिला चांगलंच फटकारलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. चौकशीसाठी काल उशिरा दाखल झाल्यानं समीर वानखेडे चांगलेच संतापले होते. चौकशीसाठी 11 वाजताची वेळ दिली असताना अनन्या दुपारी 2 वाजता पोहोचली, त्यामुळं समीर वानखेडे यांनी तिला खडेबोल सुनावले.
काल एनसीबीनं सलग दुसऱ्या दिवशी अनन्याला चौकशीसाठी बोलावलं होतं. एनसीबीनं अनन्याला सकाळी 11 वाजताची वेळ दिली होती. मात्र ती तीन तास उशीरा म्हणजे 2 वाजता एनसीबी कार्यालयात पोहोचली. त्याआधी देखील अनन्याला एनसीबीनं 2 वाजताची वेळ दिली होती मात्र अनन्या 4 वाजता पोहोचली होती. यामुळं एनसीबी त्या दिवशी व्यवस्थित चौकशी करु शकली नाही.
सलग दुसऱ्या दिवशी ती उशीरा आल्यानं समीर वानखेडे यांनी तिला फटकारलं. समीर वानखेडे यांनी म्हटलं की, तुम्हाला 11 वाजता बोलावलं आणि आपण आता आलात. अधिकारी तुमची वाट पाहात बसलेले नाहीत. हे तुमचं प्रोडक्शन हाऊस नाही. हे सेंट्रल एजेंसीचं ऑफीस आहे. ज्यावेळेवर बोलावलं आहे, त्याच वेळेवर पोहोचा, अशी तंबीही त्यांनी अनन्याला दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अनन्या पांडेने ड्रग्ज सेवन आणि पुरवठा करण्याच्या गोष्टीला नाकारले
अनन्या काल दुपारी 2.15 च्या सुमारास एनसीबी कार्यालयात पोहोचली आणि तिचे वडील चंकी पांडे यांच्यासोबत संध्याकाळी 6.21 वाजता बाहेर पडली. एनसीबीने तिला सोमवारीदेखील या प्रकरणी चौकशीसाठी बोलावले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशी दरम्यान अनन्या पांडेने ड्रग्ज सेवन आणि पुरवठा करण्याच्या गोष्टीला नाकारले आहे.
अनन्याची चौकशी का केली जात आहे?
अनन्या पांडेची गुरुवारी सुमारे 2 तास चौकशी करण्यात आली. अनन्या पांडेला ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानसोबत झालेल्या चॅटच्या आधारावर बोलावले होते. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चॅटमध्ये असा आरोप केला जात आहे की अनन्या गांजाबद्दल बोलत होती. आर्यन त्या चॅटमध्ये गांजाची व्यवस्था करण्याबद्दल बोलत होता असाही आरोप आहे. मात्र, पहिल्याच दिवशी चौकशीदरम्यान अनन्याने आरोप नाकारले होते.
चौकशीच्या पहिल्या दिवशी काय झालं?
गुरुवारी, जेव्हा अनन्या पांडे तिचे वडील चंकी पांडे यांच्यासह NCB च्या झोनल हेड क्वार्टरमध्ये दुपारी 4 च्या सुमारास पोहोचली, तेव्हा चंकी पांडेला चौकशीतून बाहेर बसवले गेले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास अधिकारी व्ही.व्ही.सिंग, झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि एका महिला अधिकाऱ्याने अनन्या पांडेची चौकशी केली.
एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले की अनन्या पांडेने सांगितले की ती धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आर्यन खानसोबत शिकली आहे आणि ती आर्यन खानची बहीण सुहानाची जवळची मैत्रीण आहे. यामुळे, आर्यन, सुहाना आणि अनन्या हे एकमेकांचे कौटुंबिक मित्र आहेत. शूटिंग शेड्यूल व्यतिरिक्त, जेव्हा ती घरी राहते, तेव्हा प्रत्येकजण एकत्र येतात, ज्यामध्ये शाळेतील मित्रांचे एक सर्कल देखील आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशी दरम्यान अनन्याने NCB ला व्हिडीओ चॅट बद्दल सांगितले की ही चॅट त्यावेळी सिगारेट आणण्याच्या संदर्भात होती, बराच वेळ निघून गेला आहे, यामुळे तिला नक्की कोणत्या संदर्भात ही गोष्ट आठवत नाही आणि वीड हे एक ड्रग्ज आहे याची त्यांना जाणीव नव्हती.