अब्जाधिश सलमान खानच्या पायात फाटके बूट, व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांनी शोधून काढली ब्रँडेड किंमत
बॉलिवूडचा सुलतान सलमान खान त्याच्या साधेपणा आणि बिनधास्त स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतो. पण यावेळी त्याचा एक व्हिडिओ वेगळ्याच कारणाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Salman Khan : बॉलिवूडचा सुलतान सलमान खान त्याच्या साधेपणा आणि बिनधास्त स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो अनेकदा साध्या टी-शर्ट आणि जीन्समध्ये दिसतो, पण यावेळी त्याचा एक व्हिडिओ वेगळ्याच कारणाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चाहत्यांचे लक्ष सलमानच्या बुटांनी वेधलं आहे. जे बूट खूप जुने आणि फाटलेले दिसतात.
हा व्हिडिओ समोर येताच नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. काही जण याला सलमानचा साधेपणा म्हणत आहेत, तर काही जण त्याचा निष्काळजीपणा म्हणत आहेत. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, लोकांना जो फाटलेला बूट वाटतो, त्याची किंमत खरंतर लाखो रुपये आहे.
भाईजानचा रांगडा लूक
अलीकडेच, सलमान खान एका कार्यक्रमात अगदी कॅज्युअल लूकमध्ये दिसला. त्याने काळ्या रंगाचा चेक्ड शर्ट आणि जीन्स घातली होती. त्याच्या हातावर त्याचे सिग्नेचर 'लकी चार्म' ब्रेसलेटही दिसत होते. पापाराझींसाठी पोज देताना सलमान खूपच निवांत दिसत होता, पण लोकांचे लक्ष त्याच्या बुटांकडे वेधले गेले. व्हिडिओमध्ये त्याच्या बुटांचे चामडे पुढच्या बाजूने फाटलेले दिसत आहे आणि एका बुटाला तर मोठे छिद्रही पडले आहे. हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरले, ज्यामुळे प्रश्न निर्माण झाले.
शूज फाटलेले किंवा जुने नाहीत, तर...
सलमान खानच्या फाटलेल्या शूजवर सोशल मीडियावर चर्चा सुरु होताच, सत्य समोर आले. खरे तर, हे शूज फाटलेले किंवा जुने नाहीत, तर 'पॅरिस स्नीकर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बॅलेन्सियागा या लक्झरी फॅशन ब्रँडचे 'सुपर-डिस्ट्रेस्ड' शूज आहेत. फॅशनच्या जगात याला 'डिस्ट्रेस्ड लूक' म्हणून ओळखले जाते. तुम्हाला हे जाणून धक्का बसेल की, या 'जीर्ण' दिसणाऱ्या शूजची किंमत सुमारे 1,850 डॉलर म्हणजेच अंदाजे 1 लाख 42 हजार 962 रुपये आहे.
या 'डिस्ट्रेस्ड' फॅशनमागे नेमकं काय?
या लक्झरी ब्रँडनुसार, हे शूज मुद्दाम घाणेरडे, जीर्ण आणि आधीच वापरलेले दिसावेत अशा प्रकारे डिझाइन केले आहेत. हे स्नीकर्स एका क्लासिक डिझाइनला दिलेला एक नवा साज असून, ते 20 व्या शतकातील ॲथलेटिक शैली आणि कालातीत कॅज्युअल शैली यांचे मिश्रण सादर करतात. ते जुन्या कॅनव्हास आणि खडबडीत कडा वापरुन तयार केले आहेत, ज्यामुळे त्यांना तो विंटेज लूक मिळतो. ब्रँडचा दावा आहे की हे कलेक्शन आयुष्यभर घालण्यासाठी डिझाइन केले आहेत. ते लेस-अप हाय-टॉप्स किंवा बॅकलेस स्टाईलमध्ये उपलब्ध आहे.






















