(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sakhi Gokhale : 'मी खूप नशिबवान आहे की माझा बाबा लवकर गेला, क्रूर वाटेल पण...'; सखी गोखलेने व्यक्त केल्या वडिलांविषयीच्या भावना
Sakhi Gokhale : अभिनेत्री सखी गोखले हीने तिचे वडिल दिवगंत अभिनेते मोहन गोखले यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Sakhi Gokhale : दिवंगत ज्येष्ठ अभिनेते मोहन गोखले (Mohan Gokhale) यांची लेक सखी गोखले (Sakhi Gokhale) हिने तिच्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. दिग्गज कलाकारांच्या यादीत मोहन गोखलेंचं नाव आजही अग्रस्थानी घेतलं जातं. मोहन गोखले गेल्यानंतर अभिनेत्री शुभांगी गोखले (Shubhangi Gokhale) यांनी आई आणि बाबा अशा दोन्ही भूमिका सांभाळत सखीचा सांभाळ केला. दोन्ही मायलेकी त्यांच्या नात्याविषयी आणि मोहन गोखलेंच्या आठवणींविषयी अनेकदा बोलतात. पण नुकतच सखीने तिच्या वडिलांविषयीच्या काही स्पष्ट भावना व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं आहे.
सखी गोखले आणि शुभांगी गोखले यांनी नुकतच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोहन गोखलेंच्या अनेक आठवणी सांगितल्या आहेत. तसेच यावेळी सखीने केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होतेय. सखी सहा वर्षांची असताना मोहन गोखलेंनी या जगाचा निरोप घेतला. त्यावेळी सखी अगदीच लहान होती, त्यामुळे वडिलांसोबतच्या फारश्या आठवणी नसल्याचं सखी वारंवार सांगते. पण यावेळी तिने तिचे वडिल लवकरच गेले ही गोष्ट माझ्यासाठी चांगली झाल्याचं सखीने म्हटलं आहे. पण सखीने असं का म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.
मी खूप नशिबान आहे - सखी गोखले
आई सोबतच आहे पण कधी वडिलांची उणीव जाणवते का? या प्रश्नाचं उत्तर देताना सखीने स्पष्ट उत्तर दिलं आहे. मी हे आधीही म्हटलं होतं की, हे ऐकायलाही क्रूर वाटतं, पण मी खूप नशिबवान आहे की बाबा मी खूप लहान असताना गेला. म्हणजे मी इतकी लहान की माझ्याकडे त्याच्या खूप अशा आठवणी नाहीयेत. कारण जसं जसं तुम्ही मोठं होत जाता, तशा तुमच्या आठवणी खूप स्ट्राँग होत जातात. तुम्ही बाबांच्या जवळचे की आईच्या हेही मला तेव्हा कळत नव्हतं. पण तो असेपर्यंतही तो इतकं काम करत होता आणि आईच तेव्हा माझ्याबरोबर असायची. जे लोकं कळत्या वयात त्यांच्या आईवडिलांना गमावतात, त्यांच्यासाठी हे खूप कठिण आहे. पण माझा बाबा अशा वेळी गेला जेव्हा मला काहीच कळत नव्हतं. त्यामुळे मला बाबा असणं काय असतं हेच माहित नाहीये आणि ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे.
मोहनच्या नजरेतून तिला जग बघायला मिळायला हवं होतं - शुभांगी गोखले
शुभांगी गोखले यांनी याविषयी बोलताना म्हटलं की, मला सखी कधी कधी वाटतं सखीसाठी की मोहन हवा होता. मोहनला क्रिकेट असो राजकारण असो सगळ्या गोष्टी मुखोद्गत होत्या. मोहनकडून तिला त्या गोष्टी कानावर पडायला हव्या होत्या. मोहनच्या नजरेतून तिला जग बघायला मिळायला हवं होतं. मी तिला फिरवते. जितकं तिला फिरवता येईल तितकं मी तिला फिरवते. पण मोहनच्या नजरेतून होणारा प्रवास मी खूप मिस करते.