(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रितेश-जिनिलियाची भन्नाट लव्हस्टोरी, दहा वर्ष डेट अन् लग्नाच्या दोन दिवस आधी हटके प्रपोज...
बॉलिवूडमधील लाडका अभिनेता रितेश देशमुख (riteish deshmukh) आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया डिसूजा (Genelia D'Souza) या जोडीला ज्या सिनेमानं आयुष्यभरासाठी एकत्र आणलं तो सिनेमा म्हणजे तुझे मेरी कसम.
मुंबई : बॉलिवूडमधील लाडका अभिनेता रितेश देशमुख (riteish deshmukh) आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया डिसूजा (Genelia D'Souza) या जोडीला ज्या सिनेमानं आयुष्यभरासाठी एकत्र आणलं तो सिनेमा म्हणजे तुझे मेरी कसम. या सिनेमानंच या दोघांना जवळ आणलं. ही फेव्हरेट जोडी दिवाळी पाडव्यानिमित्त एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या विशेष कार्यक्रमात आली आहे. यावेळी त्यांनी अनेक किस्से सांगितले आहेत. आज सायंकाळी चार वाजता हा कट्टा प्रसारित होणार आहे. यावेळी दोघांनी आपल्या नात्यावर भाष्य केलं.
रितेश आणि जिनिलियाला 'तुझे मेरी कसम' सिनेमा कसा मिळाला? सांगितली रंजक स्टोरी
10 वर्षांच्या डेटिंगनंतर केलं लग्न
जिनिलियानं सांगितलं की, त्यानंतर आम्ही फेब्रुवारी 2002 पासून आम्ही डेटिंग केली. त्यानंतर फेब्रुवारी 2012 साली आम्ही दहा वर्षानंतर लग्न केलं. आम्ही लॉन्ग डिस्टंस रिलेशनशिप होतं. आम्ही टाऊनला भेटायचो लपूनछपून. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. आम्ही चांगले मित्र झालो. मग आम्ही प्रेमात पडलो. दोन व्यक्तिंना जेव्हा एकमेकांना सवय होते त्यावेळी नातं पुढं जातं. आम्ही एकत्रित घालवत असलेला वेळ खूप महत्वाचा होता. आम्हाला घरातून विरोध नव्हता. जिनिलिया म्हणाली की, माझी आई म्हणायची काय चाललंय तर आम्ही म्हणायचे काही नाही. आम्ही लग्नासाठी कधीच घाई केली नाही. तुम्हाला असं वाटलं की एखाद्या व्यक्तिसोबत आयुष्य काढायचं आहे. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आम्ही मित्रांना सांगायचो की आम्ही जस्ट फ्रेंड आहोत. आमच्यात प्रपोज कुणीच केलं नाही. लग्नाच्या आधी मात्र एकदा ऑफिशियली प्रपोज करावं अशी जिनिलियाची इच्छा होती. लग्नाच्या आधी फिल्मफेअरचं शूट होतं. लग्नाच्या आधी मी जिनिलियाला म्हटलं मला ताजला जायचं आहे. मला शूज घ्यायचा आहे असं मी तिला सांगितलं. गेटवे ला गेल्यानंतर एका बोटीने आम्ही एका यॉटवर गेलो. सायंकाळची वेळ होती. सूर्य मावळतीला डेकवर संगीत चालू होतं. मरिन ड्राईव्हवर आम्ही पोहोचलो. तिथं माझ्या एका मित्राचं घर होतं. मी तिथं पोहोचतात त्याला सिग्नल दिला. त्यानं लगेच इमारतीवरुन आतिषबाजी सुरु केली आणि मग मी जिनिलियाला प्रपोज केलं आणि विल यू मॅरी मी असं विचारलं. तो दिवस भन्नाट होता, असं रितेश म्हणाला.
रितेशनं सांगितलं की, मी हैदराबादला लूक टेस्टला गेलो होतो. मला सांगण्यात आलं की हिरोईन देखील त्याच विमानानं येणार आहे. आम्ही विमानातून उतरल्यानंतर प्रोडक्शनच्या एका व्यक्तिनं आमची ओळख करुन दिली. त्यावेळी मी जिनिलियाला HI केलं तर तिनं अॅटिट्यूड दाखवत Hello असं म्हटलं, असं रितेशनं सांगितलं. यावर जिनिलिया म्हणाली की, मी विचार केला की, हा मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे. तो अॅटिट्यूड दाखवेल, त्याआधी मीच अॅटिट्यूड दाखवला. रितेशनं सांगितलं की, दोन दिवसानंतर आम्ही शूटिंगच्या ठिकाणी भेटलो. तिथं जिनिलियानं तिथं असलेल्या झाडाझुडपांकडे इशारा करत मला विचारलं की, त्या झाडीच्या पाठीमागे तुमचे बॉडिगार्ड आहेत का? पण मी सांगितलं की माझ्याकडे बॉडिगार्ड नाही. विलासराव देशमुख आठ वर्ष मुख्यमंत्री असताना मला एकदाही सेक्युरिटी नव्हती, असं रितेश म्हणाला. मी ही कधीच मागितली नाही, त्यानंतर जिनिलियाला वाटलं की आता आपण याच्याशी बोलू शकतो, असं त्यानं सांगितलं.
रितेशनं सांगितलं की, तुझे मेरी कसम हा सिनेमा माझ्या आधी जिनिलियाला मिळाला. हा सिनेमा दुसरा अभिनेता करणार होता. तो अभिनेता त्यावेळी दुसरा सिनेमा करत होता. त्यावेळी त्या अभिनेत्याला एका सिनेमाची निवड करायला सांगितलं गेलं. त्यावेळी त्यानं दुसरा चित्रपट निवडला. मग या सिनेमासाठी निर्मात्यांना जिनिलियासोबत एक फ्रेश चेहरा हवा होता. मी एकदा सुभाष घई यांच्या सेटवर गेलो होतो. कारण मला फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटवर प्रोजेक्ट बनवायचा होतो. मला स्टुडिओ वगेरे काही माहिती नव्हतं. त्या कामासाठी गेलो असता तिथल्या डीओपीला वाटलं मी चित्रपटात अॅक्टिंग करायला आलो आहे. या घटनेच्या दीड वर्षानंतर मला फोन आला की, असा एक सिनेमा आहे त्यात काम कराल का? त्यावेळीही मी बघू असं सांगितलं. मला वाटलं आपल्या पुढच्या पीढीला सांगता येईल की, आपल्याला चित्रपटाची ऑफर मिळाली होती. त्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो तर त्यांनी डन असं सांगितलं.
जिनिलियासोबत भांडणं झाल्यानंतर रितेशची भन्नाट ट्रिक, माझा कट्ट्यावर सांगितलं गुपित
यावेळी रितेश म्हणाला की, मला जाणीव होती की आपले वडील मुख्यमंत्री आहेत. आपण असंच निर्णय घेऊ शकत नाही. आईला सांगितल्यावर त्यांनी होकार दिला. मग मी बाबांना भेटायला गेलो. वर्षा बंगल्यावर त्यांना भेटलो आणि चित्रपट करणार असल्याचं सांगितलं. त्यावर ते म्हणाले तू अॅक्टिंग करणार आहेस का? मी हो असं सांगितलं. त्यानंतर मी त्यांना म्हटलं की, सिनेमा चालला नाही तर लोकं विलासरावांच्या मुलाचा सिनेमा चालला नाही असं म्हणत तुमच्यावर टीका होईल. माझी काही ओळख नाही, तुमची ओळख आहे. त्यावर ते (विलासराव देशमुख) की, तू तुझ्या नावाची काळजी घे मी माझ्या नावाची काळजी घेईल. तुम्हाला जे आयुष्यात करायचं आहे त्याची जबाबदारी आपणच घ्यायला हवी, असं रितेशनं सांगितलं. त्यानंतर ही फिल्म फायनल झाली, असं रितेशनं सांगितलं.