Ranveer Singh: एकीकडे FWICE बंदीचा वाद; दुसरीकडे रणवीर सिंह चामुंडेश्वरी मंदिरात; जमिनीवर बसला, हात जोडत मागितली माफी
न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत रणवीर आता मंदिरात पोहोचला असून, जमिनीवर बसून हात जोडत त्याने माफी मागितली.

Ranveer Singh: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहे. निर्माता दिग्दर्शक फरहान अख्तर याच्या बहुचर्चित 'डॉन 3' सिनेमाशी संबंधित वादाच्या पार्श्वभूमीवर फेडरेशन ऑफ वेस्टन इंडिया सिने एम्प्लॉईजनं (FWICE) नं सर्व निर्मात्यांना रणवीर सिंहला आपल्या सिनेमांमध्ये कास्ट करू नये असं आवाहन केल्यानंतर रणवीर कर्नाटकातील चामुंडेश्वरी मंदिरात दर्शनासाठी पोहोचला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार त्याने सार्वजनिकरित्या हात जोडून माफी मागितली. कांतारा मिमिक्री वादप्रकरणात त्याने अखेर त्याची चूक सुधारली आहे.
‘कांतारा’ मिमिक्रीमुळे वादात अडकलेला रणवीर
गेल्या वर्षी गोवा फिल्म फेस्टिव्हलदरम्यान रणवीर सिंहकडून एक मोठी चूक झाली होती. कार्यक्रमात त्याने दक्षिणात्य अभिनेता ऋषभ शेट्टीसमोर त्याच्या गाजलेल्या ‘कांतारा चॅप्टर-1’ चित्रपटातील सीनची मिमिक्री केली होती. या प्रकारामुळे रणवीरवर मोठ्या प्रमाणात टीका झाली आणि त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली. हे प्रकरण नंतर कर्नाटक उच्च न्यायालयात पोहोचलं. एफआयआर रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने रणवीरला फटकारलं आणि चामुंडेश्वरी मंदिरात जाऊन माफी मागण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत रणवीर आता मंदिरात पोहोचला असून, जमिनीवर बसून हात जोडत त्याने माफी मागितली.

या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अनेक चाहत्यांनी रणवीरच्या या भूमिकेचं कौतुक करत, चूक मान्य करून न्यायालयाच्या आदेशाचं पालन केल्याबद्दल त्याचं समर्थन केलं आहे.
Mysuru, Karnataka | Actor Ranveer Singh visited Chamundeshwari Temple and offered prayers here.
— ANI (@ANI) May 26, 2026
Chamundeshwari Kshetra Development Authority Secretary M.J. Roop says, "Actor Ranveer Singh arrived at Chamundeshwari Hills at 7:30 am like a regular devotee and sat in the temple… pic.twitter.com/oAfqe8y6CI
रणवीरचे आगामी प्रोजेक्ट्स चर्चेत
‘धुरंधर’ फ्रँचायझीनंतर अभिनेता म्हणून रणवीर सिंहची मागणी वाढली आहे. मात्र ‘डॉन 3’ वादामुळे FWICE कडून त्याच्यावर घालण्यात आलेल्या बंदीमुळे वातावरण तापलं आहे. रणवीरच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झाल्यास, तो लवकरच ‘प्रलय’ या चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा आहे. याशिवाय शाहरुख खानच्या आगामी ‘किंग’ चित्रपटातही तो कॅमिओ करताना दिसू शकतो.





















