Year End 2020 | नववर्षाच्या स्वागतासाठी आमिर सिंधुदुर्गमध्ये, तर रणबीर- रणवीर राजस्थानमध्ये
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी नाही म्हणता आता सर्वांनी धकाधकीच्या आणि काहीशा आळसावलेल्या आयुष्याला दूर लोटत एक नवी सुरुवात करण्यासाठी काही खास ठिकाणांच्या दिशेनं प्रवास सुरु केला आहे. सेलिब्रिटी मंडळीसुद्धा यात मागे राहिलेले नाहीत.
मुंबई : कडू- गोड आठवणी आणि अनुभवांचा अनुभव देणारं 2020 हे वर्ष आता अवघ्या काही तासांत सर्वांचा निरोप घेणार आहे. या वर्षाला निरोप देत आणि येणाऱ्या 2021 (New year) या वर्षाचं सकारात्मकतेनं आणि तितक्याच उत्साहात स्वागत करण्य़ाकडे सर्वांचा कल दिसून येत आहे. नव्या वर्षाच्या निमित्तानं एका नव्या दशकाचीही सुरुवात होणार आहे. त्यामुळे हे वर्ष आणखी खास. अशा या आनंदपर्वाच्या निमित्ताने अनेकांनीच पर्यटनस्थळांकडे रोख केला आहे. अगदी सेलिब्रिटीही यात मागे राहिलेले नाहीत.
बी- टाऊन सेलिब्रिटींची नावं घ्यावी तर सध्या, परफेक्शनिस्ट आमिर खान हा चार दिवसांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर गेला आहे. मंगळवारीच तो इथं हेलिकॉप्टरच्या माध्यमातून दाखल झाला. कुटुंबासमवेत तो पुढील काही दिवस इथं असणार आहे.
तर, तिथे रणबीर कपूर , आलिया भट्ट, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण ही मंडळीसुद्धा सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी रवाना झाले आहेत. रणबीर कपूर हा त्याच्या कुटुंबीयांसमवेत असून, आलिया भट्टही त्यांच्यासोबत असल्याचं म्हटलं जात आहे. आलियाची आईसुद्धा त्यांच्यासोबत असणार आहे.
नीतू कपूर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सुट्टीची उत्साहात सुरुवात करातनाचे काही फोटो शेअर केले. यामध्ये अभिनेता रणवीर सिंगही दिसत आहे. कपूर आणि भट्ट कुटुंबीय राजस्थानमध्ये गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
रणवीर आणि दीपिका मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिसले. तर, आलिया आणि रणबीर कलिना विमानतळावरुन खासगी विमानानं प्रवास करताना दिसले. हे सर्व कलाकार राजस्थानमध्येच गेले असल्यामुळं रणबीर- आलियाचं लग्न आहे का, असा मजेशीर प्रश्नही चाहत्यांनी सोशल मीडियावर उपस्थित केला.
काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीदरम्यान, रणबीरनं त्याच्या लग्नाबाबत लक्षवेधी वक्तव्य केलं होतं. कोरोना महामारीचं संकट आलं नसतं, तर एव्हाना आपण विवाहबंधनात अडकलो असतो, असं तो म्हणाला होता. खासगी जीवनाबबात कोणतेही संकेत न देता थेट वक्तव्य करण्याला प्राधान्य देणारा रणबीर येत्या काळात विवाहबंधनात अडकण्याची दाट शक्यता त्याच्या याच वक्तव्यामुळं वर्तवण्यात येत आहे. तूर्तास तो आलिया आणि कुटुंबीयांसह काही खास क्षणांचा आनंद घेत असून, याच क्षणांत रममाण होत आहे हेच खरं.