(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pushkar Jog : 'जे मराठी, मराठी करतात, तेच लॉबिंग करतात', मराठी इंडस्ट्रीविषयी पुष्कर जोगने मांडलं स्पष्ट मत
Pushkar Jog : मराठी इंडस्ट्रीविषयी अभिनेता पुष्कर जोग याने त्याचं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. तसेच त्याने मराठी इंडस्ट्रीतल्या लॉबिंगविषयी देखील भाष्य केलं आहे.
Pushkar Jog : 'जबरदस्त' या सिनेमातून मराठी प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) अल्पावधीच प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरला. त्यानंतर बिग बॉस मराठी पहिल्या सीजनमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहचला. पहिल्याच सिजनमध्ये पुष्कर हा उपविजेता ठरला होता. त्यानंतर पुष्करचे काही सिनेमे देखील प्रेक्षकांच्या भेटीला आले. बऱ्याचदा त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे पुष्कर अनेकदा चर्चेत असतो. नुकतच त्याने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मराठी इंडस्ट्रीविषयी भाष्य केलं आहे.
मराठी इंडस्ट्रीतल्या लॉबिंगविषयी अनेक कलाकारांनी आतापर्यंत त्यांची स्पष्ट मतं मांडली आहेत. पुष्करने यावर स्पष्ट भाष्य केलं आहे. पुष्करने नुकतच भार्गवी चिरमुलेच्या गप्पा मस्ती पॉडकास्टला भेट दिली. यामध्ये त्याने अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. मराठा आरक्षणच्या सर्वेवेळी पुष्करने केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे तो बराच चर्चेत आला होता. त्यानंतर त्याला बरंच ट्रोल देखील करण्यात आलं, त्यानंतर पुष्करने माफीची देखील पोस्ट शेअर केली होती.
'तेच जास्त लॉबिंग करतात'
पुष्करने मराठी इंडस्ट्रीविषयी बोलताना म्हटलं की, मुळात आपली मराठी इंडस्ट्री इंडस्ट्री आहे का, तर अजिबातच नाहीये. इथे एकजूट आहे का तर नाहीये. एका मराठी माणसाला दुसऱ्या मराठी माणसाचं चांगलं झालेलं आवडत नाही. आज आपल्याच इंडस्ट्रीची माणसं जे म्हणतात, मराठीसाठी हे मराठीसाठी ते तेच जास्त ग्रुपिंग आणि लॉबिंग करतात. ह्या व्यक्तीला काम द्यायचं नाही, का तर तो तुमची हांजी हांजी नाही करत. या सगळ्या अडचणी आहे. मला सध्या कोणाची साथ नाहीये. पण मी आपल्या चित्रपटांसाठी नक्की मेहनत करेन.
आपल्यासारखं टॅलेंट कुठेच नाही - पुष्कर जोग
आपली मराठी इंडस्ट्री जर खऱ्या अर्थाने एकत्र आली तर इथे बाकी कोणत्याच इंडस्ट्री राहणार नाही. कारण आपल्याकडे जे टॅलेंट आहे ते कुठेच नाही. पण इथे एकजूट होणार नाही तोपर्यंत काहीच होऊ शकणार नाही. आपण कधीच चित्रपट रिलीज करताना एकमेकांना फोन करत नाही. सारख्या तारखांना सिनेमा रिलीज करतो. कधी एकमेकांसाठी पोस्ट लिहित नाही. त्यामुळे बॉलीवूडमध्येही मराठी कलाकारांना पाण्यातच पाहिलं जातं, असं पुष्करने म्हटलं.
'मला ऑस्करमध्ये जाऊन मराठी बोलायचंय'
या मुलाखतीदरम्यान पुष्कर जोगने त्याला ऑस्करमध्ये जाऊन मराठी बोलायचं आहे, अशी इच्छा देखील व्यक्त केली. यावर त्याने म्हटलं की, मी पुढच्या 12 वर्षांचा प्लॅन आखला आहे. मला पुढच्या 12 वर्षांत दोन राष्ट्रीय पुरस्कार आणि एक ऑस्कर माझ्या मराठी सिनेमासाठी जिंकायचा आहे. मला ऑस्करमध्ये जाऊन मराठी बोलायचं आहे, तिथे मला जय हिंद जय महाराष्ट्र बोलायचंय आहे आणि हे मी करुन दाखवेनच. हा माझा माज नसून माझ्या मनातली एक इच्छा आणि तळमळ आहे. आज माझ्याकडे जे काही आहे ते माझ्या मराठी प्रेक्षकांमुळे आणि चाहत्यांमुळे.