Purushottam Berde On Marathi Cinema : मराठी सिनेमाच्या आर्थिक नाड्या 'या' दोन निर्मात्यांच्या हातात; पुरुषोत्तम बेर्डे यांचा सनसनाटी आरोप
Purushottam Berde On Marathi Cinema : पुरुषोत्तम बेर्डे यांनी आपल्या एका मुलाखतीत हा सनसनाटी आरोप केला आहे. या दोन लोकांनी मराठी सिनेसृष्टी आपल्या ताब्यात ठेवली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Purushottam Berde On Marathi Cinema : मराठी चित्रपटाच्या आर्थिक नाड्या या दोन व्यक्तींच्या हाती असल्याचा मोठा आरोप ज्येष्ठ दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे (Purushottam Berde) यांनी केला आहे. पुरुषोत्तम बेर्डे यांनी आपल्या एका मुलाखतीत हा सनसनाटी आरोप केला आहे. या दोन लोकांनी मराठी सिनेसृष्टी आपल्या ताब्यात ठेवली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सिनेमागल्लीला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी हा आरोप केला आहे. या मुलाखतीत पुरुषोत्तम बेर्डे यांनी मराठी चित्रपटाच्या अर्थकारणावरही भाष्य केले. त्यांनी म्हटले की, जुन्या काळात चित्रपट फ्लॉप झाला तर निर्मात्याची आर्थिक कोंडी होत असे, आजही तशीच स्थिती आहे. आज फार काही बदल झाला नाही. निर्मात्याला किती पैसे मिळतात आजही हा कळीचा मुद्दा आहे.सध्या अशी व्यवस्था तयार केलीय की चॅनेलला, वितरकांना फायदा होतो. जुन्या काळात चित्रपट वितरक आणि प्रदर्शित करणारे कमावत असे. त्यामुळेच निर्मात्यांना अनुदानासाठी धावाधाव करावी लागत असल्याकडे पुरुषोत्तम बेर्डे यांनी लक्ष वेधले. चित्रपटाची निर्मिती होईपर्यंत चित्रपटावर निर्मात्याची मालकी असते. चित्रपट तयार झाल्यानंतर वितरक वगैरेंवर अवलंबून राहावे लागते. चित्रपट तयार झाल्यानंतर ठरलेला हिस्सा निर्मात्याला मिळतो असे पुरुषोत्तम बेर्डे यांनी सांगितले.
मराठी सिनेसृष्टी ठाराविक लोकांच्या हाती
मराठी सिनेमा पुन्हा एकदा ठाराविक लोकांच्या हातात गेला असल्याचे पुरुषोत्तम बेर्डे यांनी म्हटले. नानूभाई जयसिंघानी, संजय छाब्रिया आणि चॅनेल्स हातात मराठी सिनेमाचे अर्थकारण एकवटले असल्याचा आरोप त्यांनी केला. पुरुषोत्तम बेर्डे यांनी आपला अनुभव सांगताना म्हटले की, 'निशाणी डावा अंगठा' चित्रपट दाखवल्यानंतर त्यांनी काहीच न बोलता निघून गेले. त्यांच्यादृष्टीने कसला फालतू चित्रपट बनवला अशा प्रकारचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसला. आता अशा लोकांच्या हातात इंडस्ट्री असल्यावर मराठी सिनेमाचे काय होणार, असा प्रश्नही पुरुषोत्तम बेर्डे यांनी उपस्थित केला. आजही इंडस्ट्री कोणाच्या तरी हातात आहे. ते अर्थकारण नियंत्रित करत असल्याचे त्यांनी म्हटले.
महेश कोठारे, अलका कुबलचे कौतुक
पुरुषोत्तम बेर्डे यांनी पुढे म्हटले की ज्यावेळी ही मंडळी नव्हती त्यावेळी सिनेइंडस्ट्री वितरकांवर अवलंबून होती. त्यांनी इंडस्ट्रीवर नियंत्रण ठेवले होते. महेश कोठारे सारख्या दिग्दर्शकाचा वितरकावर वचक होता. त्याचा फायदा त्याला झाला. अलका कुबल-समीर आठल्ये यांनी चित्रपट निर्मिती केल्यानंतर ते स्वत: गावोगाव फिरले असल्याचेही पुरुषोत्तम बेर्डे यांनी सांगितले.