(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Priyadarshan Jadhav : 'अभिनेता नसतो तर राजकारणात नक्की असतो', प्रियदर्शन जाधवने व्यक्त केली इच्छा; मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणंही टाळलं
Priyadarshan Jadhav : अभिनेता प्रियदर्शन जाधव याने त्याला राजकारणात रस असल्याचं म्हटलं. पण त्याने आता राजकीय गोष्टींवर कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही असा निर्णय घेतला आहे.
Priyadarshan Jadhav : अभिनेता प्रियदर्शन जाधव (Priyadarshan Jadhav) हा नुकताच शक्तिमान या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. विनोदी अभिनेता म्हणून प्रियदर्शनने आजवर प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्याच्या विनोदी भूमिका या तितक्याच पसंतीस देखील उतरल्या. पण जर प्रियदर्शन हा विनोदी अभिनेता नसता तर तो राजकारणात गेला असता, असा खुलासा स्वत: प्रियदर्शनेच केला आहे. टाईमपास 2 मधील प्रियदर्शनची दगडूची भूमिका विशेष गाजली. पण याच प्रियदर्शनला राजकारण गाजवायला आवडलं असतं, असही त्याने म्हटलं आहे.
प्रियदर्शनने नुकतीच अजब गजब या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी त्याने सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणं टाळलं. पण त्याने त्याची इच्छा मात्र व्यक्त केली आहे. स्पृहा जोशी आणि आदिनाथ कोठारे यांच्यासोबत शक्तिमान या सिनेमात झळकला.
प्रियदर्शनने काय म्हटलं?
एखाद्या गोष्टीमध्ये आपण उगाच गुंतून जातोय, असं कधी झालय का? या प्रश्नाचं उत्तर देताना प्रियदर्शने त्याच्या आयुष्यातला एक किस्सा सांगितला. प्रियदर्शनने म्हटलं की, 'मी आता राजकीय पोस्ट बघणं बंद केलंय आणि मी ते ठरवून बंद केलंय. तसं पाहायला गेलं तर मला राजकारणात भयंकर रस आहे. मी जर अभिनेता नसतो तर मी नक्कीच राजकारणात असतो.पण माझ्या आईवडिलांना ते कधी आवडलं नसतं. त्यांचं असं होतं की, काहीही कर पण राजकारणात जाऊ नकोस. माझ्या आईवडिलांनी मला कधीच कोणत्या गोष्टींना अडवलं नाही, मग माझं असं झालं त्यांना हे नकोय तर आपण करायला नको. त्यामुळे मी आता राजकीय पोस्टवर रिऍक्ट करणं बंद केलंय.'
याचं कारण सांगताना प्रियदर्शनने म्हटलं की, 'मी एका राजकीय पोस्टवर रिऍक्ट झालो आणि माझ्या घरी कोल्हापुरात आईवडिलांना फोन गेला. तिकडे त्यांना फोनवर अशी धमकी देण्यात आली की, तो मुंबईच्या बाहेर पडू द्या, मी त्याचे पायच तोडतो. मला घाबरण्यासारखं ह्यात काहीही नाही आणि ह्यात घाबरण्यासारखंही काही नाही. पण ते जर घरापर्यंत जात असेल आणि आपल्या घरच्यांना याच्यामुळे त्रास होत असेल तर हे नको करायला. तसेच यावेळी प्रियदर्शनने सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणंही टाळलं.'