Pranit Hatte : तृतीयपंथी असल्यामुळे मराठी अभिनेत्रीला हॉटेलमध्ये नाकारली एन्ट्री, सोशल मीडियावर संतप्त पोस्ट; म्हणाली, 'आम्ही काय घाणेरडी...'
Pranit Hatte : एका प्रसिद्धी तृतीयपंथी मराठी अभिनेत्रीसोबत नुकतच एक संतापजनक प्रसंग घडला आहे. यावर तिने तिच्या सोशल मीडियावरुन पोस्ट केली आहे.
Pranit Hatte : कलेला कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं, असं म्हणत अभिनेत्री प्रणित हाटे (Pranit Hatte) हिने कलाविश्वात तिचं असं स्थान निर्माण केलं. झी युवा वाहिनीवर काही दिवसांपूर्वी आलेल्या युवा डान्सिंग क्वीन या कार्यक्रमातून प्रणित घराघरात पोहचली. या कार्यक्रमातून ती गंगा म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यानंतर तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळेही ती अनेकांच्य पसंतीस उतरली. पण सध्या ही अभिनेत्री एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकतच तिने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन एक संतप्त पोस्ट शेअर केली आहे.
प्रणित ही गंगा म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्यानंतर तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट विशेष लक्ष वेधून घेतात. कधी तिने केलेल्या फोटोशूटमुळे तर कधी तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे प्रणित अनेकदा चर्चेचा विशेष असते. नुकतच प्रणित एका कार्यक्रमादरम्यान नाशिकला गेली असता तिथे तिला आलेल्या एका वाईट अनुभवाविषयी सोशल मीडियावर भाष्य केलं आहे.
प्रणितची सोशल मीडिया पोस्ट नेमकी काय?
प्रणितने तिच्या इन्स्टाग्रामवर नाशिकमधील एका हॉटेलमधला फोटो पोस्ट केला आहे. यावर तिने ती तृतीयपंथी असल्यामुळे तिला हॉटेलमध्ये एन्ट्री नाकारली असल्याचं तिने म्हटलं आहे. तिने तिच्या स्टोरीला हा फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये तिने म्हटलं की, एका कार्यक्रमासाठी मी नाशिकमध्ये आले होते. तिथल्या एका हॉटेलमध्ये मी रुम बुक केली होती, पण अचानक माझं बुकींग रद्द करण्यात आलं. जेव्हा मी त्याचं कारण त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की, तुम्ही तृतीयपंथी आहात, त्यामुळे तुम्हाला हॉटेलमध्ये राहायला परवानगी नाही. अशावेळी आम्ही कुठे जायचं?
प्रणितने व्हिडिओ शेअर करतही केला संताप व्यक्त
दरम्यान या सगळ्यानंतर अनेकांनी प्रणितला प्रतिक्रिया दिल्या. त्यानंतर प्रणितने एक इन्स्टाग्राम लाईव्ह केलं. तिने तिच्या या व्हिडिओमध्ये म्हटलं की, मी जी स्टोरी शेअर केली, ती कित्येकांनी पाहिली त्याबद्दल मला कल्पना नाही. पण यावर काय करता येईल? त्याबाबत मला कळवा. सध्या मी नाशिकमधील पूजा इंटरनॅशल हॉटेलमध्ये आहे. इथे एका कार्यक्रमासाठी आले होते. या हॉटेलमध्ये कालपासून बुकिंग केली होती. आज चेकींगवेळी त्यांनी माझे डॉक्युमेंट्स चेक करुन झाल्यावर सांगितलं की, तुम्ही तृतीयपंथी असल्यामुळे आम्ही तुमचं बुकींग रद्द करतोय.
आम्ही तृतीयपंथी म्हणून आम्हाला हॉटेलमध्ये राहण्याचा अधिकार नाही?
पुढे प्रणितने म्हटलं की, माझ्यासारखे अनेक तृतीयपंथी आहेत जे कार्यक्रमासाठी किंवा कोणत्यातरी कामासाठी बाहेर जातात. पण एक महत्त्वाची गोष्ट आम्ही कुठंलही चुकीचं काम करायला आलो नाहीत, किंवा वायफळ आणि घाणेरडंही काम करायला आलो नाही आहोत. तृतीयपंथी म्हणून बुकींग रद्द केली, त्यावेळी आम्ही कुठे बुकींग करायची. हे किती हास्यास्पद आहे. आता काय हॉटेलमध्ये लोगो लागणार आहेत का? तृतीयपंथी आहोत म्हणून आम्हाला हॉटेलमध्ये राहण्याचा अधिकार नाही का? मी आजारी असते आणि खूप गरज असती तर काय केलं असतं? असं म्हणत प्रणितने तिचा संताप व्यक्त केला आहे.
View this post on Instagram